IND vs ENG Test 2021: ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी सलग दुसऱ्यांदा पराभवाची चव चारल्यावर टीम इंडिया (Team India) स्वतःच्या घरी आता इंग्लंडला (England) टक्कर देण्यासाठी कंबर कसून तयार आहे. 5 फेब्रुवारीपासून चार सामन्यांच्या टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिला टेस्ट सामना खेळल्यावर मायदेशी परतलेला विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा कर्णधारपद सांभाळेल. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या जबरदस्त विजयानंतर कोहलीच्या नेतृत्वावर मोठा दबाव असेल, शिवाय फलंदाज म्हणून विराट मोठी करण्यासाठी उत्सुक असेल. 2020 मध्ये कोरोनाच्या परिसरामुळे मर्यादित क्रिकेट खेळलेला विराट तीनही फॉरमॅटमध्ये शतकी धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरला. मागील वर्षी त्याची सर्वोच्च धावसंख्या 89 अशी होती. त्यामुळे, नवीन वर्षाचा पहिला सामना खेळणाऱ्या विराटवर आपल्या शतकांचा दुष्काळ संपवण्याचं मोठं आव्हान असेल. (IND vs ENG Series 2021: इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीचा दबदबा! इंग्लिश टीमविरुद्ध टेस्ट सामन्यात आतापर्यंत ठोकली आहे 5 शतके)
मागील वर्षी विराट श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध टी-20, ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-20 आणि वनडे मालिका खेळला, पण यामध्ये विराटला एकदाही शंभरी गाठता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगलोर आणि सिडनी वनडे सामन्यात विराट शतकाच्या जवळ पोहचला होता मात्र दोन्ही वेळी तो 89 धावांवर जोश हेझलवूडने त्याला माघारी पाठवलं. कांगारू संघाविरुद्ध कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जेव्हा भारतीय कर्णधार शानदार लयीत बॅटिंग करत होता तेव्हा त्याच्या शतकाचा दुष्काळ संपवेल असे दिसत होते पण अजिंक्य रहाणेच्या चुकीच्या कॉलमुळे विराट 74 धावांवर रनआऊट झाला. कोहलीने 2020 मध्ये तीन कसोटी सामन्यांच्या 6 डावांमध्ये 19.33 च्या सरासरीने केवळ 116 धावा केल्या ज्यात त्याने एक अर्धशतक ठोकले. अशा स्थितीत, विराट यंदा इंग्लंडविरुद्ध मालिकेत शंभरी धावसंख्या गाठणार की नाही याचे मोठे आव्हान असणार आहे.
दुसरीकडे, इंग्लंडविरुद्ध विराटचा रेकॉर्ड पाहता टीम इंडिया कर्णधार तिहेरी धावसंख्या गाठेल असे दिसत आहे. विराटने 2016 मध्ये द्विशतकी कामगिरी केली आहे. भारत आणि इंग्लंड संघातील पहिला टेस्ट सामना 5 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे खेळला जाणार आहे.