IND vs ENG Test Series 2021: ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात धूळ चारल्यावर भारतीय संघ (Indian Team) आता इंग्लंडच्या (England) आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. पुढील महिन्यात इंग्लंड संघ भारताचा दौरा करणार आहे, मात्र त्यापूर्वी चाहत्यांसाठी मोठी खुशखबर समोर येत आहे. इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांच्या टेस्ट सिरीजसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. आगामी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआय चेपाक (Chepauk) आणि नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियम (Motera Stadium) या दोन्ही ठिकाणी 50 टक्के लोकांना उपस्थिती देण्यास गंभीरपणे विचार करीत आहे. पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथे 5 फेब्रुवारीपासून होणार असून अंतिम दोन कसोटी सामने अहमदाबादच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर खेळले जातील. बीसीसीआय (BCCI) क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अनुसरण करण्याच्या तयारीत आहे ज्यांनी भारताविरुद्ध मालिकेदरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी दिली होती. (India vs England Test Series: भारतीय संघाची घोषणा; कोहली, इशांत आणि हार्दिक पांड्या खेळणार तर पृथ्वी शॉ संघातून बाहेर)
“आतापर्यंत आम्ही चार कसोटी सामन्यांसाठी 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याची शक्यता आहे. बीसीसीआय राज्य क्रिकेट संघटना (टीएनसीए आणि जीसीए) आणि राज्य आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहे,” बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर PTI ला म्हटले. तथापि, बीसीसीआय कोविड-19 मुळे जनतेच्या आरोग्याची कमकुवत स्थितीवरही लक्ष ठेवून आहे आणि चेन्नई किंवा अहमदाबादमध्ये प्रकारात भर झाल्यास त्यानुसार निर्णय बदलला जाईल. “जर सर्व आवश्यक खबरदारी घेऊन 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली तर ते सूचक ठरेल की आम्ही आयपीएलदरम्यान प्रेक्षकांना भारतात परवानगी देऊ शकतो,” सूत्रांनी पुढे म्हटले. एक लाखांहून अधिक प्रेक्षक संख्या असलेल्या अहमदाबाद स्टेडियममध्ये सामाजिक अंतर राखणे ही समस्या ठरणार नाही.
दरम्यान, गुरुवारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) भारतविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा करणार आहे. पहिल्यांदाच जेव्हा एखादा दौऱ्यावरील टीम खेळाडूंच्या वर्कलोड व्यवस्थापन लक्षात घेत मालिकेसाठी पूर्ण संघाची घोषणा करत नाही आहे. चेन्नई आणि अहमदाबाद यांच्यात दोन स्वतंत्र बायो-बबल असतील आणि संघ देशामध्ये चार्टर्ड फ्लाइटने प्रवास करतील.