IND vs ENG: एजबॅस्टन कसोटीत भारतीय चाहत्यांवर वर्णद्वेषी टिप्पण्या; ECB ने दिले चौकशीचे आदेश
IND vs ENG (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्या वर्षी जेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला गेली होती तेव्हा मोहम्मद सिराजवर जातीय टिप्पणी (Racism) करण्यात आली होती. सिराज सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना ही घटना घडली होती. सध्या टीम इंडिया इंग्लंडच्या (ENG vs IND 5th Test) दौऱ्यावर असून, या दौऱ्यावरही जातीय टिप्पणीचे प्रकरणही समोर आले आहे. ही घटना सामन्याच्या चौथ्या दिवशी घडली. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला, मात्र सामन्याच्या चौथ्या दिवशी आपल्याला वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याची तक्रार काही भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर केली आहे.

एका युजरने ही घटना सोशल मीडियावर शेअर केल्यावर ही बाब समोर आली. या युजरने लिहिले की, ‘इंग्लंडच्या चाहत्यांनी एरिक हॉलिस स्टँडवर भारतीय चाहत्यांसोबत वर्णद्वेषी कमेंट केल्या.’ वर्णद्वेषी कमेंटचे हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि एजबॅस्टन मैदानाच्या अधिकाऱ्यांनी सामन्यादरम्यान वर्णद्वेषाच्या घटनेची दखल घेतली आहे आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

एजबॅस्टनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, 'अशा गोष्टी ऐकून मला धक्का बसला आहे, कारण आम्ही एजबॅस्टनमध्ये प्रत्येकासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करत आहोत. ट्विट समोर आल्यानंतर मी त्या व्यक्तीशी वैयक्तिकरित्या बोललो आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.’ (हेही वाचा: जसप्रीत बुमराहने कपिल देव यांचा 'हा' विक्रम काढला मोडीत, अशी कामगिरी करणारा बनला दुसरा भारतीय गोलंदाज)

ईसीबीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'कसोटी सामन्यांमध्ये वर्णद्वेषी कमेंट्सच्या बातम्यांमुळे आम्ही चिंतेत आहोत. आम्ही एजबॅस्टन येथील सहकाऱ्यांच्या संपर्कात आहोत जे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाला स्थान नाही. सुरक्षित आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी एजबॅस्टन कठोर परिश्रम घेत आहे.’ दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे तर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना इंग्लंडने सात गडी राखून जिंकला. यासह मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. इंग्लंडसमोर सामना जिंकण्यासाठी 378 धावांचे लक्ष्य होते. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी शतके झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.