IND vs ENG 2nd Test Day 2: चेपॉकवर (Chepauk) टीम इंडियाने (Team India) पहिल्या डावात केलेल्या 329 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंड (England) संघाचा पहिला डाव 134 धावांवर संपुष्टात आला. रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) इंग्लंड फलंदाजांना आपल्या फिरकीत अडकवत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. अश्विनने 29 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये 5 विकेट घेतल्या आहेत. इशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 2 तर मोहम्मद सिराजला 1 विकेट मिळाली. अशाप्रकारे, टीम इंडियाने दुसऱ्या डावात 195 धावांची आघाडी घेतली असून फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला आहे. बेन फोक्स (Ben Foakes) 42 धावा करून नाबाद परतला. त्याच्यापाठोपाठ ओली पोपने 22 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही इंग्लंडच्या खेळाडूला 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही आणि नियमित अंतराने विकेट गमावत राहिले. (IND vs ENG 2nd Test 2021: विराट कोहलीच्या अपीलवर 'Whistle Podu' ने गुंजले चेपॉक, Video पाहत म्हणाल- वाह कॅप्टन!)
दुसऱ्या सत्राखेरपर्यंत 8 विकेट्स गमावल्यानंतर बेन फोक्सने जॅक लीचला साथीला घेतले आणि दोघांनी इंग्लंडला फॉलोऑनपासून वाचवले. मात्र, लीचला इशांतने 59व्या ओव्हरमध्ये 5 धावांवर बाद करत इंग्लंडला 9वा धक्का दिला. लीचचा झेल यष्टीरक्षक रिषभ पंतने जबरदस्त कॅच घेत माघारी पाठवलं. त्यानंतर, पुढच्याच ओव्हरमध्ये अश्विनने स्टुअर्ट ब्रॉडला त्रिफळाचीत करत वैयक्तिक 5वी विकेट घेतली आणि इंग्लंडला स्वस्तात गुंडाळलं. आघाडीचे सहा फलंदाज माघारी परतल्यानंतर फोक्सने मोईन अली याच्यासोबत मिळून डाव सावरला पण, दुसऱ्या सत्राखेर अली आणि त्यापाठोपाठ ओली स्टोनही पॅव्हिलियनमध्ये परतला. यापूर्वी, इंग्लंडचा सलामी फलंदाज रोरी बर्न्स शून्यावर माघारी परतला. डॅन लॉरेन्सने 9 आणि कर्णधार जो रूट 6 धावाच करू शकला. बेन स्टोक्सने 18 आणि डोम सिब्लीने 16 धावांचे योगदान दिले.
दुसरीकडे, पहिल्या डावात फलंदाजी करत टीम इंडियाने रोहित शर्माच्या 161, अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी 67 आणि रिषभ पंतच्या नाबाद 58 धावांच्या जोरावर 329 धावांचा डोंगर उभारला होता. इंग्लंडकडून पहिल्या डावात मोईनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या स्टोनने 3 तर जॅक लीचने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं.