IND vs BAN 1st T20I: ऐतिहासिक मॅचमध्ये बांग्लादेशचा विजय, टीम इंडियाला 7 विकेटने पराभूत करत केली पहिल्या विजयाची नोंद
रोहित शर्मा आणि महमदुल्लाह (Photo Credits: Getty Images)  

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये पहिल्या टी-20 सामन्यात बांग्लादेशने (Bangladesh) टीम इंडियाविरुद्ध विकेटने विजयाची नोंद केली आहे. आजचा हा सामना आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील 1000 वा सामना होता. या ऐतिहासिक सामन्यात विजय मिळवत बांग्लादेश संघाने टीम इंडियाविरुद्ध पहिल्या विजयाची नोंद केली. आत्तापर्यंत बांगलादेशने भारता (India) विरुद्ध 8 सामने खेळले होते आणि आठही सामने टीम इंडियाने जिंकले होते. या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार महमूदुल्लाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीची निवड केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. मुशफिर रहीमच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशच्या संघाने 19.3 षटकांत 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. रहीम 60 धावा करून नाबाद परत आला, तर कर्णधार महमूदुल्लाने विजयी षटकार ठोकला जो 15 धावांवर नाबाद राहिला. (IND vs BAN 1st T20I: शिवम दुबे याला बाद करण्यासाठी आफिफ हुसैन याने पकडला अप्रतिम कॅच, आपल्याच गोलंदाजीवर केली ही कमाल, पाहा Video)

बांग्लादेश संघाने सुरुवातीपासून भारतावर बॉल आणि बॅटने वर्चस्व बनवून ठेवले होते. सामन्याच्या दुसर्‍या डावात भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) याने संघाला लवकर यश मिळवून दिले. त्याने बांग्लादेशचा सलामीवीर फलंदाज लिटन दास (Liton Das) याला राहुलच्या हाती 7 धावांवर झेलबाद केले. बांग्लादेशला दुसरा धक्का मोहम्मद नईम (Mohammad Naim) याच्या रूपात लागला. त्याने 26 धावा केल्या आणि शिखरच्या हाती युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. खालील अहमद याने सौम्य सरकार (Soumya Sarkar) याला बोल्ड करत बांग्लादेशला तिसरा धक्का दिला.

टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करत गोलंदाजांनी प्रभावी खेळी करत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना खास कामगिरी करण्यास अपयशी राहिले. भारताकडून शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्याव्यतिरिक्त अन्य फलंदाज प्रभाव पडण्यास अपयशी राहिले. भारतीय संघासाठी वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि क्रुणाल पंड्या (Krunal Pandya) यांनी अखेरच्या षटकात वेगवान धावा केल्या आणि टीम इंडियाचा स्कोर आदरणीय स्थितीत आणला. सुंदरने 5 चेंडूत 2 षटकारांसह 14 धावा केल्या. त्याच वेळी पांड्याने 8 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 15 धावा केल्या. यानंतर भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. अष्टपैलू शिवम दुबे याने भारतीय संघाकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.