IND vs BAN 3rd T20I: दीपक चाहर याने बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियासाठी पहिली हॅटट्रिक घेत टी-20 मध्ये केली सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची नोंद, वाचा सविस्तर
दीपक चाहर (Photo Credit: BCCI/Twitter)

भारत आणि बांग्लादेश संघात गपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा शेवटचा सामना भारतीय संघाने जिंकला. सामन्यासह भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारतीय संघाने या मालिकेचा शेवटचा सामना 30 धावांच्या फरकाने जिंकला. या सामन्यात बांग्लादेश संघाचा कर्णधार महमूदुल्ला (Mahmudullah) याने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) च्या अर्धशतकांमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 174 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांग्लादेशचा संघ 19.2 षटकांत 144 धावा करू शकला. यासह बांग्लादेशने सामना 30 धावांनी आणि मालिका 2-1 अशी गमावली. (IND vs BAN 3rd T20I: दीपक चाहर याची हॅटट्रिक; बांग्लादेशचा धावांनी पराभव करत टीम इंडियाने 2-1 ने जिंकली मालिका)

केवळ 5 गोलंदाजांसह, भारतीय संघाला अतिरिक्त गोलंदाजांची आवश्यकता असल्याचे सुरुवातीला वाटले होते, पण दीपक चहर (Deepak Chahar) याने एकट्याने भारताला विजय मिळवून दिला. दीपकने हॅटट्रिकसह 6 विकेट घेतले. दीपकने भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची पहिली हॅटट्रिक 18 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आणि त्यानंतर 20 व्या षटकातील पहिल्या-दुसर्‍या चेंडूवर विकेट्स घेऊन घेतली. इतकेच नाही, तर दीपकने आता टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा विक्रमही नोंदविला आहे. चहरने अवघ्या 3.2 षटकांत सहा बांगलादेशी खेळाडूंना पॅव्हिलियनमध्ये पाठवले. चाहरने सात धावा देऊन सहा विकेट घेतले. त्याने श्रीलंकेचा माजी गोलंदाज अजंथा मेंडिस (Ajantha Mendis) याला मागे टाकले. मेंडिसने 2012 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 8 धावांवर 6 विकेट घेतल्या होत्या.

भारताने बांग्लादेशला 175 धावांचे लक्ष्य दिले होते. दीपकने सुरुवातीला लिटन दास आणि सौम्य सरकार यांना सलग दोन चेंडूंत बाद केले परंतु त्यावेळी तो हॅटट्रिकला मुकला. यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने शिल्लक ओव्हर दीपकला दिले आणि अंतिम षटकात त्याने बांग्लादेशला करत पराभूत करत आश्चर्यकारक खेळाचे प्रदर्शन केले.