IND vs AUS 4th Test 2021: दुखापतीने टीम इंडिया त्रस्त, वेगवान गोलंदाजाने ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या डावात सोडले मैदान
नवदीप सैनी (Photo Credits: Twitter)

IND vs AUS 4th Test 2021: ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर खेळाडूंच्या दुखापतींनी टीम इंडिया (Team India) परेशान झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा (Gabba) येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेच्या चौथ्या आणि अंतिम सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. ब्रिस्बेन टेस्टसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनने सर्वांच्याच भुवया उंचावल्या कारण रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. आणि आता सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताच्या आणखी एका खेळाडूला सामन्यादरम्यान मैदान सोडून जावे लागले. 37व्या ओव्हरचा पाचवा चेंडू फेकल्यावर नवदीप सैनीच्या (Navdeep Saini) पायात ताण आल्यामुळे त्याला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी मैदानाबाहेर जावे लागले. सैनीच्या ओव्हरचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने चेंडू हातात घेतला. (IND vs AUS 4th Test 2021: अरे बाप रे! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाचे 19 खेळाडू उतरले मैदानावर, 59 वर्षानंतर भारतीय संघावर ओढवली अशी नामुष्की)

सैनीच्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर स्लिपमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेने मार्नस लाबूशेनचा झेल सोडला. यानंतर सैनीवर फिजिओने ग्राउंडवर उपचार केले पण त्याचा काही फायदा झाला नाही. ज्यानंतर तो फिजिओसह मैदानाबाहेर गेला. सैनीने सिडनीमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्ट सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले होते. उमेश यादवच्या जागी सैनीला भारतीय कसोटी संघात संधी मिळाली होती. सिडनी टेस्टच्या दोन्ही डावात सैनीने कांगारू गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आणि 4 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघातील कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. ब्रिस्बेन कसोटी जिंकल्यास ऑस्ट्रेलिया मालिका काबीज करेल. दुसरीकडे, भारताकडे दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सिरीज जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. यापूर्वी, 2018-19 दौऱ्यावर पहिल्यांदा संघाने रेड बॉल मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

दुखापतीमुळे रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी चौथ्या सामन्यातून बाहेर पडले होते, त्यामुळे गब्बा कसोटीसाठी टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हनयामध्ये तब्बल चार बदल करावे लागले. चौथ्या कसोटीसाठी भारताने मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकुर,वॉशिंग्टन सुंदर व टी नटराजनचा संघात समावेश केला आहे. विशेष म्हणजे, बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या चार सामन्यात मिळून भारतीय संघात तब्बल 8 बदल झालेले आहेत. तर चेतेश्वर पुजारी आणि अजिंक्य रहाणे हे दोन खेळाडू असे आहेत ज्यांनी चारही कसोटी सामने खेळले.