IND vs AUS 3rd Test 2021: रिषभ पंतने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत नावावर केले दोन ‘मोठे’ विक्रम; चेतेश्वर पुजारा पार केली ‘सहा हजारी’
चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ (Indian Team) मैदानावर विजय मिळवण्यासाठी धडपडत आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 407 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने पाच विकेट गमावून 288 धावा केल्या आहेत. हनुमा विहारी सध्या संघातील खालच्या फळीतील अनुभवी फलंदाज 57 चेंडूत नाबाद 5 धावा आणि रविचंद्रन अश्विन 38 चेंडूत 15 धावा करून खेळत आहेत. दिवसाच्या पहिल्या सत्रात अजिंक्य रहाणेची विकेट गमावल्यावर रिषभ पंतने (Rishabh Pant) चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) साथीने शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पंतने सर्वाधिक 97 धावांची खेळी केली तर पुजारा 77 धावा करून परतला. यादरम्यान, दुखापतीतून कमबॅक करत पंतने अर्धशतकी खेळी करत दोन मोठ्या विक्रमांची नोंद केली. (IND vs AUS 3rd Test 2021: रवींद्र जडेजा फ्रॅक्चर अंगठ्यासह मैदानात उतरण्यास सज्ज, टीम इंडिया स्टारच्या लढाऊ वृत्तीचे नेटकऱ्यांकडून कौतुक)

ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात 50 हुन अधिक धावा करणारा तो सर्वात युवा विकेटकीपर ठरला आहे. पंतने वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी ही खास कामगिरी केली आहे. याबरोबरच त्याने माजी ऑस्ट्रेलियन विकेटकीपर आयन हिली यांचा विक्रमही मोडला आहे. हिली यांनी वयाच्या 24व्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात 50 हून अधिक धावा केल्या होत्या. याशिवाय, पंत ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेटकीपर ठरला आहे. पंतने आजवर ऑस्ट्रेलियामध्ये 10 कसोटी डावात 487 धावा केल्या आहेत. यापूर्वी, माजी भारतीय यष्टीरक्षक सय्यद किरमानी आणि एमएस धोनीने ऑस्ट्रेलियात 300 हुन अधिक धावांची नोंद केली होती. किरमानी यांनी पंतपूर्वी 17 टेस्ट डावात 471 धावा करत ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय विकेटकीपर म्हणून पहिले स्थान पटकावले होते तर, धोनी 18 डावात 311 धावा करत दुसऱ्या क्रमांकावर होता.

दुसरीकडे, 77 धावांच्या खेळी दरम्यान पुजाराने कसोटी सामन्यात सहा हजार धावांचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजारी पूर्ण करणारा पुजारा भारताला 11वा फलंदाज आहे. पुजारानं 134व्या डावांत 48 च्या सरासरीनं सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. शिवाय, पंत आणि पुजाराची जोडीही आजच्या सामन्यात हिट ठरली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची नोंद केली आहे. पंत आणि पुजारा यांनी चौथ्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली. यापूर्वी विजय हजारे आणि रशी मोडी यांच्यात 1949 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये चौथ्या विकेटसाठी 139 धावांची भागीदारी केली होती. तिसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या डावात पंत 118 चेंडूत 97धावा करून नॅथन लायनचा दुसरा शिकार ठरला, तर पुजाराने 205 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 77 धावा करून जोश हेजलवुडच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला.