चेतेश्वर पुजारी आणि रिषभ पंत (Photo: Twitter, Getty)

IND vs AUS 3rd Test Day 3: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील सिडनी टेस्ट (Sydney Test) मॅचच्या तिसऱ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टीम इंडियाला दोन मोठे झटके दिले आणि लंचपर्यंत अजिंक्य रहाणेच्या भारताने 4 विकेट गमावून 180 धावा केल्या आहेत. टीम इंडिया अद्यापही ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 158 धावांनी पिछाडीवर आहे. अनुभवी कसोटी फलंदाज बाद झाल्यावर संघाला आता 'टेस्ट स्पेशालिस्ट' चेतेश्वर पुजारा आणि युवा फलंदाज रिषभ पंतचा सहारा आहे. पुजारा 144 चेंडूत नाबाद 42 धावा करून खेळत आहे. रिषभ पंत त्याला साथ देत नाबाद 29 धावा करून खेळपट्टीवर खेळत आहे. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने पहिल्या स्तरात संघाच्या दोन खेळाडूंना माघारी धाडलं. कमिन्सने सध्या एकूण 2 तर हेझलवूडला 1 विकेट मिळाली. यापूर्वी, दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या शुभमन गिलने 50 धावांचा अर्धशतकी डाव खेळला तर रोहित शर्मा 26 आणि प्रभारी कर्णधार रहाणे 22 धावा करून माघारी परतले. (IND vs AUS 3rd Test Day 3 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टेस्ट मॅच लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल?)

तिसऱ्या दिवशी रहाणे आणि पुजाराने 2 बाद 96 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली. दोघांनी संघाला शंभरी पार करून दिली. मात्र, दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली नाही आणि कर्णधार रहाणेला 22 धावांवर कमिन्सने बोल्ड करत पॅव्हिलियनमध्ये पाठवले. तिसऱ्या दिवशी रहाणे धावसंख्येत 5 धावांच जोडू शकला. त्यानंतर, भारताला हनुमा विहारीच्या रूपात सत्रात दुसरा धक्का बसला. विहारीला 4 धावांवर धावबाद करून हेझलवूडने माघारी धाडलं. त्यानंतर, पंत मैदानावर आला आणि मोठे फटकेबाजी करत धावसंख्येचा वेग वाढवला व लंचपूर्वी टीमची धावसंख्या दोनशे पार नेली. पहिल्या सत्रात दोन मोठ्या विकेटनंतर पुजारा आणि पंतकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.

दुसऱ्या दिवशी स्टिव्ह स्मिथच्या 131, मार्नस लाबूशेनचे 91 आणि नवख्या विल पुकोवस्कीच्या 62 धावांच्या जोरावर पहिल्या डावात कांगारू संघाने 338 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 तर जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले तर मोहम्मद सिराजला 1 विकेट मिळाली.