IND vs AUS 3rd Test Day 1: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरूवात झाली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळल्या जाणाऱ्या 'पिंक टेस्ट' सामन्यात चहाच्या वेळेपर्यंत यजमान कांगारू संघाने 1 विकेट गमावून 93 धावा केल्या आहेत. विल पुकोव्हस्कीने (Will Pucovski) पदार्पणाच्या सामन्यात 97 चेंडूत सैनीच्या चेंडूवर चौकार खेचत पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले. यजमान संघाचा कर्णधार टिम पेन याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या सत्रात मोहम्मद सिराजने संघाला मोठा धक्का दिला. दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या डेविड वॉर्नरला सिराजने स्लिपमध्ये पुजाराच्या हाती झेलबाद केलं. आपल्या कमबॅक सामन्यात वॉर्नर अवघ्या 5 धावाच करू शकला. Tea ब्रेकपर्यंत यजमान संघासाठी पुकोव्हस्की नाबाद 54 धावा आणि मार्नस लाबूशेन नाबाद 34 धावा करून खेळत आहेत. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला आणि धावसंख्या पन्नाशी पार नेली. (IND vs AUS 3rd Test: सिडनी येथे टेस्ट डेब्यूसाठी नवदीप सैनीने ‘या’ गोष्टींमुळे शार्दूल ठाकूर-टी नटराजनविरुद्ध जिंकली रेस, वाचा सविस्तर)
वॉर्नर आणि पदार्पणवीर पुकोव्हस्कीची जोडी यजमान संघासाठी सलामीला आली. दोन्ही फलंदाज सावध खेळ करत असताना सिराजने चौथ्या ओव्हरच्या तिसऱ्याच चेंडूवर पुजाराकडे झेलबाद केलं. भारताविरुद्ध अखेरच्या वनडे सामन्यात दुखापतीनंतर टी-20 मालिकेला मुकलेल्या वॉर्नर पहिलाच सामना खेळत आहे, मात्र पहिल्या डावात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यानंतर, लाबूशेन आणि पुकोव्हस्की खेळत असताना काहीवेळातच पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर चांगला असल्याने पहिले सत्र लवकर संपवण्यात आले. संपूर्ण सत्रात पाऊस लपाछपी खेळत राहिला. पहिल्या सत्रात 7.1 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने 1 बाद 21 धावा केल्या होत्या. दुपारच्या जेवणानंतरही सामना सुरु होण्यास विलंब झाला. अखेर, पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू झाला.
दरम्यान, आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल झाले आहेत. रोहित शर्मा आणि वॉर्नरने आपापल्या संघासाठी पुनरागमन केलं, तर कांगारू संघाने पुकोव्हस्की आणि टीम इंडियाने नवदीप सैनीला कसोटी पदार्पणाची संधी दिली.