भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी होणार आहे. चेन्नईतील प्रतिष्ठित एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूला हरवण्याची सुवर्णसंधी आहे. खरं तर, विराट कोहलीने या सामन्यात 47 धावा केल्या तर तो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांच्या बाबतीत रिकी पाँटिंगला (2,164) मागे टाकेल. पाँटिंगने भारताविरुद्ध 59 एकदिवसीय सामन्यांमध्ये 40.07 च्या सरासरीने 2,164 धावा केल्या आहेत ज्यात 6 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 140 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 45 एकदिवसीय सामन्यांच्या 43 डावांमध्ये जवळपास 53 च्या सरासरीने 2,118 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 8 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत तो 47 धावा करताच मोठा विक्रम करेल. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd ODI: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, तिसऱ्या वनडेत रोहित शर्माला मिळणार गुरुमंत्र)
मालिका 1-1 अशी बरोबरीत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी एकदिवसीय मालिका एका रोमांचक वळणावर उभी आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने उत्कृष्ट पद्धतीने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार पुनरागमन करत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. आता दोन्ही संघांना शेवटचा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे.