टिम पेन आणि अजिंक्य रहाणे (Photo Credits: Getty Images)

IND vs AUS 2nd Test Day 3: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) सुरु असलेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचच्या तिसऱ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे आणि भारतीय संघ लंचपर्यंत 326 ऑलआऊट झाला आणि पहिल्या डावात 131 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर गडगडला त्यानंतर भारताने प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर आश्वासक आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या जागी कर्णधारपद सांभाळणाऱ्या अजिंक्यने शतकी खेळी करत सर्वाधिक 112 धावा केल्या तर जडेजाने त्याला साथ देत 57 धावांचे योगदान दिले. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने रहाणे आणि जडेजाची महत्वपूर्ण विकेट गमावली. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्कआणि नॅथन यांना प्रत्येकी 3 तर पॅट कमिन्सला 2, जोश हेझलवूडला 1 विकेट मिळाली. (IND vs AUS: ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट डेब्यू करत 'या' 3 भारतीय फलंदाजांनी खेळला सर्वाधिक मोठा डाव, 'या' ओपनरने पटकावले अव्वल स्थान)

मेलबर्नमधील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू जडेजाने अर्धशतक केले आहे, मात्र दिवसाच्या सुरुवातीलाच कर्णधार अजिंक्य धावबाद होऊन माघारी परतला. 100व्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर जेडजा आणि रहाणे चोरटी एकेरी धाव घेत असताना रहाणे धावबाद झाला. त्याला मार्नस लाबूशेन आणि लायनच्या जोडीने माघारी धाडलं आणि कांगारू संघाला मोठा दिलासा मिळाला. रहाणेने आपल्या डावात 223 चेंडूत 112 धावा केल्या. यात त्याच्या 12 चौकारांचा समावेश आहे. रहाणे आणि जडेजामध्ये 121 धावांची भागीदारी केली. रहाणे बाद झाल्यानंतर जडेजाने132व्या चेंडूत त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. यानंतर स्टार्कने जडेजाला 57 धावांवर कमिन्सकडे झेलबाद करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. उमेश यादवने 19 चेंडूत 9 धावा केल्या.

यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु भारतीय संघाने कांगारू संघाला 195 धावांवर ढेर केले. त्यानंतर भारताला चांगली सुरुवात मिळाली नव्हती, परंतु कर्णधार रहाणेने शुभमन गिल, जडेजा तसेच रिषभ पंतच्या चांगली भागीदारी रचली आणि संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली.