कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) 2020 मध्ये मार्च महिन्यात क्रिकेटवर काही काळ ब्रेक लागल्यावर जून महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली.2020 मध्ये यंदा अशा अनेक अनपेक्षित गोष्टी घडल्या आहेत. मात्र, आता हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येत आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour of Australia) रवाना झाला आहे. मात्र, दौऱ्याची सुरुवात काही चांगली झाली आणि आणि वनडे मालिकेत त्यांना 2-1ने पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, भारतीय संघाने कोरोना प्रभावित वर्षात फक्त 9 वनडे सामने खेळले असून सहा सामन्यात त्यांचा पराभव झाला तर फक्त तीन सामने त्यांनी जिंकले आहेत. आश्चर्यजनक म्हणजे यंदा टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) वनडेमध्ये एकही शतक करता आलेले नाही. गोलंदाजांच्या बाबतीतही असेच अनपेक्षित घडलेले समोर आले. (IND vs AUS: विराट कोहली नाही तर 'या' फलंदाजाने टीम इंडियासाठी वनडेत 2020 मध्ये केल्या सर्वाधिक धावा, रोहित शर्माने न खेळता रचला अनोखा विक्रम)
टीम इंडिया गोलंदाजांसमोर 2020 वर्ष काही खास सिद्ध झाले नाही. गोलंदाजांना त्यांच्या खराब कामगिरीसाठी टीकेला सामोरे जावे लागले. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजांचे काही थक्क करणारे आकडे यंदा पाहायला मिळाले. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. शमीने 6 सामने खेळले ज्यात त्याने 12 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारी महिन्यात बेंगलोर सामन्यात त्याने 4 विकेट घेतल्या होत्या. 2019मधेही तो भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता आणि यंदाही त्याने आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. शमीनंतर युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी 7 विकेट घेतल्या. कुलदीप यादवने 6 तर टीम इंडियाच्या गोलंदाजी हल्ल्यातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेतल्या आहेत.
दुसरीकडे,यंदा वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झांपाने अव्वल स्थान पटकावले आहे. झांपाने 13 सामन्यात 5च्या इकॉनॉमीने सर्वाधिक 27 गडी बाद केले आहेत. अल्झारी जोसेफने 6 सामन्यात 18 विकेट घेतल्या आणि तो दुसऱ्या स्थानावर आहे. जोश हेझलवूडने तिसरे स्थान मिळवले असून त्याने 16 विकेट घेतल्या आहेत.