IND vs AUS 2020-21 Series: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पृथ्वी शॉसह टीम इंडियाच्या ‘या’ 3 खेळाडूंवर असेल लक्ष
Team India (Photo Credits: Twitter/BCCI)

IND vs AUS 2020-21 Series: कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय संघ Down Under दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया (Australia) येथे पोहचले असून सध्या त्यांचा 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी सुरु आहे. 27 नोव्हेंबर रोजी वनडे मालिकेसह टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा (India Tour of Australia) सुरु होईल. आयपीएल 2020 दरम्यान बीसीसीआयने मर्यादित ओव्हर आणि कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. भारतीय संघात सर्व अपेक्षित खेळाडूंना संधी देण्यात आली असून युवा आणि नवीन खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. या दौऱ्यावर अनेक युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागून असेल. भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि टी नटराजन (T Natarajan) अशा युवा व नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे. पृथ्वीने कसोटी आणि वनडे तर सिराजने वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण केले असून नटराजनला पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे. (India Tour of Australia Schedule PDF Download: भारत-ऑस्ट्रेलिया टी-20, वनडे आणि टेस्ट मालिकेचे संपूर्ण शेड्युल, स्थळांची माहिती जाणून घ्या)

1. पृथ्वी शॉ

2018 मध्ये कसोटीत पदार्पण करणाऱ्या पृथ्वीला मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर 2019 न्यूझीलंड दौऱ्यावर त्याची कामगिरी समाधानकारक सिद्ध झाली नव्हती. शिवाय, यंदा कसोटी संघात मयंक अग्रवाल आणि रोहित शर्माचा समावेश झाला असल्याने पृथ्वी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पण पहिल्या कसोटीनंतर कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार असल्याने पृथ्वीला तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. पृथ्वी यंदा आयपीएलमधेही काही खास कमाल करू शकला नव्हता त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष्य लागून असेल.

2. मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील दौऱ्यावर वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजचा यंदा त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर खुश होऊन त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. मुख्य वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांना दुखापत झाली असल्याने त्यांचा समावेश झाला नाही आहे. अशास्थितीत सिराजकडे निवड समितीला प्रभावित करून भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्याची मोठी संधी आहे. आयपीएलमधील 9 सामन्यात त्याने 11 विकेट घेतल्या आणि संघासाठी गोलंदाजीत मुख्य भूमिका बजावली.

3. टी नटराजन

आयपीएलमध्ये यॉर्कर किंग नटराजनला फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या जागी टी-20 संघात स्थान देण्यात आले आहे. हैदराबादकडून खेळत डेथ ओव्हर्समध्ये नटराजनने शानदार गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नटराजनने 16 सामन्यांत 31.50 च्या सरासरीने 16 गडी बाद केले आणि यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट 8.02 होता.

भारत 27 नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय सामन्यांसह त्यांच्या दौर्‍याची सुरुवात करेल त्यानंतर तीन टी-20 सामने खेळले जातील तर चार कसोटी सामन्यांची मालिका 17 डिसेंबरपासून खेळली जाईल.