IND vs AUS 2020-21: रोहित शर्मा कंबर कसून तयार,ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी NCA मध्ये केली सरावाला सुरुवात
रोहित शर्मा (Photo Credits: Getty Images)

IND vs AUS 2020-21: इंडियन प्रीमियर लीग 2020 दरम्यान रोहित शर्माच्या दुखापतीबाबत (Rohit Sharma Injury) भरपूर काही लिहिण्यात किंवा सांगण्यात आले. आयपीएलच्या सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात (Indian Cricket Team) स्थान मिळाले नाही. तथापि, त्याच्या नंतर मुंबईकडून अंतिम सामन्यासह अन्य सामन्यात हजेरी लावल्यानंतर त्याला कसोटी मालिकेसाठी अपडेटेड संघात स्थान देण्यात आले. आणि आता PTIने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेल्या रोहितने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) प्रशिक्षण सुरू केले आहे. आयपीएलच्या काळात जेव्हा त्याने एमआयकडून पुनरागमन केले, तेव्हा आपली तब्येत चांगली असल्याचे दिसत होते मात्र, त्याला बरे होण्यासाठी आणखी काही वेळ हवा आहे असे बीसीसीआयचे (BCCI) मत होते. विराट कोहली अ‍ॅडिलेड (Adelaide Test) येथे पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार असल्याने रोहित शर्माची फिटनेस अधिक महत्वाची बनली आहे. (IND vs AUS 2020-21 Series: संजय मांजरेकर यांची भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या कमेन्ट्री पॅनेलमध्ये एंट्री, पाहा संपूर्ण लिस्ट)

रोहितला न्यूझीलंड दौऱ्यावर टी-20 मालिकेच्या अखेरच्या सामन्यादरम्यान देखील दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला वनडे आणि कसोटी मालिकेला मुकावे लागले होते. दुसरीकडे, दुखापतीमुळे आयपीएल 2020 मधून बाहेर पडलेला इशांत शर्माची देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवड झाली आहे, आणि त्यानेही मुख्य वेगवान गोलंदाज सुनील जोशी आणि एनसीएचे प्रमुख राहुल द्रविड यांच्या देखरेखीखाली बुधवारी गोलंदाजीचा सराव सुरु केला आहे. रोहित आणि इशांत दोघेही एकत्र ऑस्ट्रेलियासाठी रवाना होतील आणि संघात सामील होण्यापूर्वी त्यांना 14 दिवस क्वारंटाइन राहावे लागेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय मालिका 27 नोव्हेंबर रोजी वनडे मालिकेने सुरु होईल. यानंतर टी-20 आणि अखेरीस 17 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळली जाईल. दोन्ही संघातील पहिला सामना दिवस/रात्र कसोटी सामना असेल. भारताने आजवर गुलाबी चेंडूने एक तर ऑस्ट्रेलियाने पाच सामने खेळले असून सर्व मॅचमध्ये त्यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. अशा स्थितीत कोणत्या संघाला पहिला पराभव पत्करावा लागेल आणि कोणता संघ विजयी घुडदौड कायम ठेवेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.