टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs AUS 1st Test Day 2: टीम इंडियाविरुद्ध (Team India) अ‍ॅडिलेड ओव्हलमध्ये (Adelaide Oval) सुरु असलेल्या पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रलियाचा (Asutralia) पहिला डाव दुसऱ्याच दिवशी 191 धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताला 244 धावांवर रोखल्यावर कांगारू संघ भारतीय गोलंदाजांपुढे ढेर झाले. यासह 'विराटसेने'ने मालिकेच्या पहिल्या सामन्यात 53 धावांची आघाडी घेतली आहे. भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी देखील अपयशी ठरली. मार्नस लाबूशेनने (Marnus Labuschagne) एकाकी झुंज दिली, पण चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर शकला नाही. लाबूशेनने 47 धावा केल्या. अन्य कांगारू फलंदाज एकेरी धावसंख्या गाठण्यास अपयशी ठरत असताना लाबूशेन, कर्णधार टिम पेन (Tim Paine) यांनी प्रभावी खेळी केली. पेनने सर्वाधिक नाबाद 73 धावा केल्या आणि टीम इंडियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. दुसरीकडे, भारतासाठी रविचंद्रन अश्विनने 4 उमेश यादवला 3 आणि जसप्रीत बुमराहला 2 विकेट मिळाल्या. (IND vs AUS 1st Test Day 2: पृथ्वी शॉच्या 'या' चुकीवर विराट कोहलीला राग अनावर, मैदानावर शिवी दिल्याची चाहत्यांमध्ये चर्चा, जाणून घ्या पूर्ण प्रकार)

दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्सच्या भेदक माऱ्याने भारतीय फलंदाज ऑलआऊट झाले. यानंतर ऑस्ट्रेलियासाठी मॅथ्यू वेड आणि जो बर्न्सची जोडी मैदानावर आली मात्र, दोंघांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. लाबूशेनने संयमी खेळी केली, पण त्याला दुसऱ्या टोकाने प्रभावी साथ मिळाली नाही. स्टिव्ह स्मिथ 1 धवच करू शकला. ट्रेव्हिस हेडने 7 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कॅमरुन ग्रीन 11 धावाच करू शकला. लाबूशेनने कर्णधार पेनच्या साथीने सावध खेळ करत संघाला शंभरी गाठून दिली. चहाच्या वेळेनंतर उमेश यादवने एकाच ओव्हरमध्ये लाबूशेनला 47 धावांवर पायचीत करत आणि नंतर पॅट कमिन्सला अजिंक्य रहाणेकडे झेलबाद करत माघारी धाडलं.

यापूर्वी, पहिले फलंदाजी करत भारताची सलामी जोडी अपयशी ठरल्यावर चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रहाणेने आक्रमक शैलीने फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. अन्य भारतीय फलंदाज मोठी खेळी करू शकले नाही. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्कने 4 विकेट घेतल्या तर पॅट कमिन्सला 3 विकेट मिळाल्या. जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.