IPL 2021: आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात 'हा' खेळाडू करणार दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व
दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: Getty)

भारतात सर्वाधिक लोकप्रिय असेलेली इंडियन प्रीमियर लीग 2021 चा (IPL 2021) दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जाणार आहे. येत्या सप्टेंबरपासून या लीगच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. आगामी सामन्यांसाठी जवळजवळ सर्व संघाचे काही खेळाडू संयुक्त अरब अमिरातीला (UAE) पोहचले आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्ससदंर्भात (Delhi Capitals) मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलच्या 2021 दुसऱ्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) याच्याकडे सोपवण्यात आले आहे.

दिल्लीचे नियमित कर्णधार श्रेयस अय्यरने दुखापतीतून पुनरागमन केले आहे. तसेच आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात संघाचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा होती. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने आयपीएलच्या 13 व्या हंगामात अंतिम फेरीत धडक दिली होती. परंतु, आयपीएलच्या 14 व्या हंगामापूर्वी त्याला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर झाला. श्रेयसच्या अनुपस्थितीत रिषभ पंतने दिल्लीच्या संघाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे.

श्रेयस अय्यरला दुखापतीतून सावरण्यासाठी व्यवस्थापन अजून वेळ देऊ इच्छितात. यामुळे व्यवस्थापनाने रिषभ पंतला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कर्णधार म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या उर्वरित हंगामात कर्णधार बदलणार नाही. हे देखील वाचा- Tokyo Paralympics 2020: भारताला आणखी एक सुवर्णपदक! Sumit Antil याची भालाफेक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना गेल्या वर्षीचा विजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात फायनलसह एकूण 31 सामने खेळले जातील. आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरू होण्यास 20 दिवस शिल्लक आहेत. यासाठी संघांनी तयारीही सुरू केली आहे. हंगामातील उर्वरित 31 सामने 27 दिवसांच्या दरम्यान खेळले जातील जे दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे होणार आहेत.

अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी दुबईत खेळला जाईल. सध्याच्या गुणांनुसार, दिल्ली कॅपिटल्स 8 पैकी 6 सामने जिंकल्यानंतर 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. सीएसकेचा संघ सध्या सात सामन्यांत 10 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.