रिषभ पंत, भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs NZ ICC WTC Final: आयपीएल (IPL) स्थगित झाल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहते आतुरतेने इंग्लंडमध्ये (England) पुढील महिन्यात 18 ते 22 जून दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीच्या फायनल (ICC World Test Championship Final) सामन्याच्या प्रतीक्षेत आहेत. साउथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाउल स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड संघात जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आणि इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेत जबरदस्त खेळी करणाऱ्या खेळाडूंना या दरम्यान प्राधान्य देण्यात आले आहे. भारतीय संघात (Indian Team) जबरा कामगिरी करणाऱ्या धाकड खेळाडूंचा समावेश आहे पण युवा विकेटकिपर व मधल्या फळीतील बॅट्समन रिषभ पंत  (Rishabh Pant) याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. पंत मागील काही महिन्यांपासून शानदार फॉर्ममध्ये असून त्याने ऑस्ट्रेलिया (Australia)-इंग्लंड (England) सारख्या संघानांही लोळवलं आहे. (ICC WTC Final सामन्यापूर्वी घरी बसलेला Rishabh Pant अशी घेतोय फिटनेसची काळजी, म्हणतो- ‘ये दिल मांगे "मोव्हर"!’)

कोरोनामुळे सक्तीच्या ब्रेकनंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा पाऊल ठेवले. कांगारू देशात सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेतील विजयात नवोदित खेळाडूंसोबतच पंतने देखील मोलाची भूमिका बजावली. मधल्या फळीत बॅटिंगला येत पंतने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव आणला. यादरम्यान त्याने सिडनी कसोटीत 97 धावा आणि ब्रिस्बेनच्या निर्णायक सामन्यात नाबाद 89 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर, इंग्लंडविरुद्ध पंतने पुन्हा मैदान मारलं. आपल्या कामगिरीत सातत्य राखत पंतने इंग्लंडविरुद्ध चार सामन्यात 259 धावा काढल्या ज्यामध्ये एका शतकाचाही समावेश होता. त्यामुळे, न्यूझीलंडविरुद्ध जर पंतने आपल्या  सुसंगता कायम ठेवली तर तो टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो. पंत भारतीय संघाच्या मधल्या फळीतील एक मुख्य फलंदाज आहे आणि त्याची बॅट चालल्यास तो किवी संघासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो.

दरम्यान पंतच्या आजवरच्या टेस्ट करिअरबद्दल बोलायचे तर त्याने 20 कसोटी सामन्यात एकूण 1358 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय, इंग्लंडमध्ये त्याला 3 सामन्यात 162 धावा काढता आल्या आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंड विरुद्धच्या देखील पंतला प्रभावी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे, जर टीम इंडियाला विजेतेपद पटकवायचे असल्यास पंतची मधल्या फळीत भूमिका निर्णायक ठरेल.