भारतीय महिला क्रिकेट संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यावर इंग्लंडने वर्चस्व सिद्ध केल्याने अंतिम फेरीत खेळण्याचं महिला संघाचं स्वप्न भंगलं आहे.
इंग्लंड संघाने T20 विश्वचषकात 8 गडी राखत भारतावर विजय मिळवला. भारतीय महिला क्रिकेट संघाला 112 धावात माघारी धाडल्यावर इंग्लंड पुढे अवघ्या 113 धावांचं लक्ष्य होतं. अॅमी जोन्स आणि नताली सिवरने 92 धावांची भागीदारी करत संघाची बाजू भक्कम केली. जोन्सने नाबाद 53 तर सिवरने नाबाद 52 धावांची खेळी केली.
टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीची निवड करत सामनावीर स्मृती मंधाना मैदानात उतरली. पण एक्लेस्टोनने मंधानाला 34 धावातच माघारी धाडले. 23 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार लावत तिने 34 धावा केल्या. त्यानंतर दुसरी सामनावीर तानिया भाटियाचा देखील फार काळ टिकाव लागला नाही. स्किवरने कॅच झेलत 11 धावात भाटिया तंबूत परतली. त्यानंतर रोड्रिगेज, कृष्णमूर्ति आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी अनुक्रमे 26, 2, 16 इतक्या धावा केल्या.
त्यानंतर हेमलता (1) तर अनुजा पाटिल (0) वर आऊट झाल्या. त्यानंतर राधा यादव (4) आणि अरुंधती रेड्डी (6) यांच्या रुपात भारताची 8 वी आणि 9 वी विकेट पडली. शेवटी दीप्ती शर्मा (7) धावा करत रनआऊट झाली आणि भारतीय संघाने 112 धावा केल्या.
आता T20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. वेस्ट इंडिजचा 71 धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाने उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजसमोर 143 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. मात्र वेस्ट इंडिजचा डाव 71 धावातच आटोपला.