ICC T20I World Cup 2021: आकाश चोपडा यांनी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये 7 वेगवान गोलंदाजांची केली निवड, पाहा लिस्ट
आकाश चोपडा (Photo Credit: Instagram)

ICC T20I World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी कसोटी तज्ज्ञ फलंदाज आणि विद्यमान भाष्यकार आकाश चोपडा (Aakash Chopra) यांनी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये सात वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. चोपडा यांच्यानुसार सध्या अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांची नावे निश्चिती झाली आहेत. त्याचबरोबर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून दीपक चाहर (Deepak Chahar) कर्णधाराची पहिली पसंती असू शकतो. भारत कोविड-19 महामारीचा वाढत परिणाम लक्षात घेत बीसीसीआयने (BCCI) ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणारा संपूर्ण टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा युएई (UAE) आणि ओमान (Oman) येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या आयसीसी मेगा स्पर्धेपूर्वी आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने देखील युएई येथे आयोजित केले जाणार आहेत. (T20 World Cup 2021 Schedule: यूएई आणि ओमान येथे रंगणार टी-20 वर्ल्ड कपचा थरार, ICC कडून शिक्कामोर्तब)

चोपडा यांनी मोहम्मद शमी, टी नटराजन, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर यांची अनुक्रमे चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा गोलंदाज म्हणून निवड केली आहे. चोपडा म्हणाले की, श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या दीपक चाहर आणि नवदीप सैनी यांच्या कामगिरीवर निवडकर्त्यांची नजर असेल. दुसरीकडे, शमी देखील अनुभवामुळे संघात स्थान मिळविण्यात यशस्वी होऊ शकतो. याशिवाय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरनेही अलीकडच्या काळात आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच तामिळनाडूचा 30 वर्षीय वेगवान गोलंदाज टी नटराजनचेही नाव या शर्यतीत आहे. पुढे बोलताना आकाश चोपडा म्हणाले की, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांची फिरकी गोलंदाज म्हणून निवड केली जाऊ शकते.

याखेरीज श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेलेले वरुण चक्रवर्ती, राहुल चाहर आणि कुलदीप यादव यांनीही चांगली कामगिरी बजावली तर ते देखील या संघात सामील होऊ शकतात. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान बीसीसीआय तटस्थ ठिकाणी टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करेल. आता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियम, शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी मैदान या चार ठिकाणी आयोजित केले जाईल.