T20 World Cup 2020: आज ठरणार टी-20 वर्ल्ड कपच भवितव्य? ICC आयोजन पुढे ढकलण्याबाबत अंतिम निर्णयाची शक्यता
आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2020 ट्रॉफी  (Photo Credits: Getty Images)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) आज, गुरुवारी बैठक होणार असून सर्व संभाव्यतेनुसार यंदाचा टी-20 विश्वचषक (T20 World Cup) पुढे ढकलण्याबाबत निर्णय येणे अपेक्षित आहे. गेल्या तीन बैठकींमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम निर्णय घेण्यास आयसीसी असमर्थ राहिली. यंदाचा टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणे अपेक्षित आहे, पण यावर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणे 'अवास्तव' आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आधीच स्पष्ट केले आहे. India Today ने दिलेल्या संदर्भानुसार आयसीसी याबाबत आज अखेरचा निर्णय घेऊ शकते. शिवाय, ऑस्ट्रेलियाही पुढील वर्षी होणारी टी-20 स्पर्धा आयोजित करण्यास उत्सुक आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियात करोना विषाणूचा सामना करण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि आर्थिक संकटात सापडलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने इतक्या कमी कालावधीत स्पर्धेचे आयोजन करणं शक्य नसल्याचं जाहीर केलं आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलणं हाच पर्याय आयसीसीसमोर उरतो. (महिला टी-20 वर्ल्ड कपने नोंदवला व्युव्हरशीप रेकॉर्ड, बनला महिला क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक पाहिलेला कार्यक्रम)

“टी-20 विश्वचषकासाठी नवीन तारखा जाहीर केल्या जाणार नाहीत, स्पर्धेच्या भवितव्याबद्दल गुरुवारी निर्णय घेतला जाऊ शकतो. या स्पर्धेचं आयोजन एक वर्षासाठी पुढे ढकललं जाऊ शकतं,” सूत्रांनी India Today ला सांगितले. दरम्यान, पुढील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात होणार असून ते बदलण्याची शक्यता कमी आहे.

दुसरीकडे, आयसीसीकडून टी-20 विश्वचषकबाबत अधिकृत घोषणा बीसीसीआयसाठी यंदा इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) आयोजन करण्यासाठी विंडो उपलब्ध करून देऊ शकते. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. तथापि, हे सर्व सरकारच्या विविध मंजुरींवर आणि देशात कोरोना बाबतीत परिस्थितीत किती सुधारते यावर अवलंबून असेल.