(Photo Credit: Getty Images)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी आपल्या 2019 पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवडले गेले. विराट कोहली (Virat Kohli) याला कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार बनविण्यात आले. शिवाय, कोहलीला विश्वचषक 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात दाखवलेल्या खेळाडूवृत्तीसाठी स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार देण्यात आला. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यादरम्यान कोहलीने चाहत्यांना माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याच्यावर टीका करण्यापासून रोखले होते. इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषकचा मान मिळवून देणारा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याची प्लेअर ऑफ दी इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. 2019 मध्ये 59 विकेट घेणारा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याला वर्षाचा सर्वोत्कृष्ट टेस्ट क्रिकेटपटू म्हणून घोषित केले गेले.

2019 मध्ये रोहित सनसनाटी फॉर्ममध्ये होता. विश्वचषकच्या एकाच आवृत्तीत 5  शतकं ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आणि तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने 7 वनडे शतकांसह वर्ष पूर्ण केले. याच स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात कोहलीने चाहत्यांना बॉल-टेम्परिंगसाठी बंदी घालण्यात आलेल्या स्मिथसाठी प्रेक्षकांना टीका करण्याऐवजी टाळ्यांचा कडकडाट करण्यास सांगितले. 2018 मध्ये डेव्हिड वॉर्नरसह स्मिथवर केपटाऊनमधील बॉल-टेंपरिंग घोटाळ्यातील भूमिकेसाठी एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. त्या क्षणी फलंदाजी करणाऱ्या कोहलीने प्रेक्षकांना स्मिथची हुटींग करण्यापासून थांबवले आणि त्याऐवजी स्मिथसाठी टाळ्या वाजवायचा इशारा केला. सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना कोहलीने प्रेक्षकांच्या वतीने स्मिथचीही माफी मागितली. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेन याला 2019 आयसीसी पुरुषांचा उदयोन्मुख क्रिकेटर म्हणून निवडले गेले.

दुसरीकडे,आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघही जाहीर केला. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे 5, न्यूझीलंडचे 3, 2 भारतीय आणि इंग्लंडच्या एका खेळाडूचा समावेश केला आहे. आयसीसी वनडे टीम ऑफ द इयरमधेही भारतीय खेळाडूंनी वर्चस्व कायम ठेवले. रोहित, विराटसह मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांचाही समावेश करण्यात आला आहे.

आयसीसी पुरुष क्रिकेट पुरस्कार

सर गारफिल्ड सोबर्स करंडक सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू - बेन स्टोक्स (इंग्लंड)

वर्षाचा कसोटी क्रिकेटर - पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)

वर्षाचा वनडे क्रिकेटपटू - रोहित शर्मा (भारत)

टी-20 कामगिरी - दीपक चहर (भारत, 6/7 विरुद्ध बांगलादेश)

उदयोन्मुख क्रिकेटर ऑफ द इयर - मार्नस लाबूशेन (ऑस्ट्रेलिया)

असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर - काइल कोएत्झर (स्कॉटलंड)

स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड - विराट कोहली (ओव्हल सामन्यात स्टिव्ह स्मिथला हुटींग करणाऱ्या प्रेक्षकांना थांबवण्यासाठी)

अम्पायर ऑफ द इयर (डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी) - रिचर्ड इलिंगवर्थ

आयसीसी टेस्ट टीम ऑफ द इयर:  मयंक अग्रवाल, टॉम लाथम, मार्नस लाबूशेन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, बीजे वाटलिंग (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नील वॅग्नर, नॅथन लायन.

आयसीसी वनडे टीम ऑफ द इयर : रोहित शर्मा, शाई होप, विराट कोहली (कर्णधार), बाबर आझम, केन विल्यमसन, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर), मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी, कुलदीप यादव