Happy Birthday Mithali Raj: तापसी पन्नू ने अशाप्रकारे साजरा केला मिताली राज चा वाढदिवस, बायोपिकची केली पुष्टी, पाहा Photo
तापसी पन्नू आणि मिताली राज (Photo Credit: Twitter)

जेव्हा जेव्हा भारतात क्रिकेटविषयी चर्चा होते तेव्हा सर्वप्रथम पुरुष संघ आणि खेळाडूंच्या नावाची चर्चा केली जाते. परंतु एका महिला खेळाडूने आपल्या फलंदाजी आणि कर्णधाराच्या गुणधर्माने ही विचारधारा बदलली आहे. भारतीय महिला क्रिकेटला (Indian Women's Cricket) सर्वोच्च स्थानावर नेणाऱ्या या खेळाडूचं नाव-मिताली राज (Mithali Raj). मिताली आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करीत आहे. तिचा जन्म 3 डिसेंबर 1982 ला राजस्थानच्या जोधपूर शहरात झाला. या खास प्रसंगी बॉलिवूडची मिताली राज म्हणजेच तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तापसीने केवळ मितालीचे अभिनंदनच केले नाही, तर तिच्यासह वाढदिवसही साजरा केला. तापसीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटोज शेअर केले आणि तिच्या पहिल्या बायोपिकची घोषणाही केली.

फोटो शेअर करताना, तापसीने कॅप्शनमध्ये तिने मितालीला वचन दिले आहे की तिला तिचा अभिमान वाटेल. तापसीने लिहिले की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा कॅप्टन. या वाढदिवशी मला माहित नाही की मी तुम्हाला कोणती भेट देऊ शकते, पण मी वचन देते की # शबाशमिथूसह माझ्या रूपात स्वतःला पडद्यावर पहिल्याच तुम्हाला अभिमान वाटेल. पी.एस- मी सर्व ‘कव्हर ड्राइव्ह’ शिकण्यास तयार आहे." तापसीने शेअर केलेल्या फोटोमध्ये मिताली केक कापताना आणि त्यानंतर तापसीने तिला लाल गुलाब देताना दिसून येत आहे.

जगभरातील महिला क्रिकेटपटूंमध्ये मितालीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण केली आणि असं करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. आजवर भारतासाठी 209 वनडे सामने खेळल्या मितालीने 26 जून 1999 ला आयर्लंडविरुद्ध सामन्यातून वनडे कारकीर्दीची सुरुवात केली होती. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम मितालीच्या नावावर आहे. इतकंच नाही, तर महिला क्रिकेटमध्ये मिताली सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे. मितालीने 209 सामन्यात सर्वाधिक 6888 धावा केल्या आहेत. मितालीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने 2005 आणि 2017 क्रिकेट विश्वचषकच्या फायनलमध्ये धडक मारली होती. पण, दोन्ही वेळा संघाला उपविजेतेपदावर संतोष मानावे लागले.