Jos Buttler IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 चा फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात खेळला जाणार आहे. गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला, तर आपल्याला आज एक नवीन चॅम्पियन संघ मिळेल. तसेच जर राजस्थान रॉयल्सने जेतेपद पटकावले, तर 14 वर्षांनंतर रॉयल्स संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावताना पाहू. राजस्थानला येथे 14 वर्षांचा वनवास संपवायचा असेल, तर संघाचा सलामीवीर जोस बटलरला (Jos Buttler) आणखी एक स्फोटक खेळी करावी लागेल. (IPL Final 2022: कोण जिंकणार आयपीएल 15 चा किताब, ‘या’ 5 तडाखेबाज खेळाडूंचा खेळ ठरवेल सामन्याचा निकाल)
या मोसमात जोस बटलरने आतापर्यंत खेळलेल्या 18 सामन्यांत 58.85 च्या सरासरीने 824 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत बटलरने आजच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा शतकी खेळी केल्यास तो डेविड वॉर्नर आणि विराट कोहली यांना मागे टाकेल. ‘रनमशीन’ विराट कोहलीचा एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा बटलरचा विक्रम मोडणे कठीण वाटत असले तरी त्याला ‘किंग’ कोहलीच्या अबाधित विक्रमाच्या जवळ पोहोचण्याची नक्कीच संधी आहे. एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत बटलर सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. बटलरच्यावर ऑस्ट्रेलियन सलामीवीर वॉर्नर आणि ‘किंग’ कोहली आहेत. वॉर्नरने आयपीएल 2016 मध्ये 17 सामन्यात 848 धावा केल्या होत्या, त्याच मोसमात ‘किंग’ कोहलीने 973 धावांचा विक्रमी डोंगर उभारला होता. बटलरने आज पुन्हा फटकेबाजी केली तर तो वॉर्नरचा विक्रम सहज मोडेल कारण तो त्याच्यापासून केवळ 24 धावांनी मागे आहे. पण कोहलीचा विक्रम करण्यासाठी त्याला किमान 150 धावांची खेळी गरज आहे.
दरम्यान एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा कोहलीचा विक्रम नाही, तर बटलर एका मोसमात सर्वाधिक शतकांचा ‘विराट’ विक्रम नक्कीच धुळीस मिळवू शकतो. बेंगलोरविरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये शंभरी पल्ला पार करत बटलरने एका मोसमात सर्वाधिक 4 शतके झळकावण्याच्या कोहलीच्या आतापर्यंत अबाधित विक्रमाची बरोबरी केली. अशा परिस्थितीत आज जर राजस्थानच्या सलामीवीराने आज तिहेरी धावसंख्या गाठली तर तो आयपीएलच्या इतिहासात एका मोसमात 5 शतके करणारा पहिला खेळाडू बनेल.