Global Day of Parents 2020: जागतिक पालक दिनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भावुक; शेअर केला आई-वडीलांचे महत्त्व सांगणारा थ्रोबॅक फोटो
आई-वडिलांसोबत सचिन तेंडुलकर (Photo Credit: Instagram)

माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे आणि यामुळे मनुष्याचे संपूर्ण जीवन संबंधांच्या दोरखंडात बांधले जाते. नातेसंबंध जपण्यासाठी आणि आधुनिकतेच्या गर्दीत नातेसंबंधांचे महत्त्व सांगण्यासाठी प्रत्येक वर्षी जागतिक पालक दिन (Global Day of Parents) 1 जून रोजी साजरा केला जातो. 2012 मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने पालकांसाठी जागतिक दिन जाहीर केला. जगभरातील पालकांचा सन्मान करण्यासाठी 1 जून रोजी जागतिक पालक दिन आयोजित केला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याच्या आई-वडिलांचे एक वेगळेच महत्व असते. हे महत्व सांगत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने जागतिक पालक दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये त्याने पालकांचे प्रेम, पाठिंबा यांचे महत्व सांगितले. या जगात आपण देव पाहू शकत नाही, परंतु आपल्याकडे पालक आहेत ज्यांचा दर्जा देवापेक्षा उंच आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीमध्ये त्याच्या पालकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. (ब्रायन लारा याच्या मुलाची फलंदाजी पाहून सचिन तेंडुलकरला आली स्वतःच्या बालपणाची आठवण, शेअर केली खास पोस्ट)

सचिनने इंस्टाग्रामवर एक आई-वडिलांसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले,"आम्ही मोठे होत असताना आमच्या पालकांनी आमच्यावर केलेले बिनशर्त प्रेम, पाठिंबा आणि लक्ष यांनी वैयक्तिकरित्या पाया घातला. माझ्या आयुष्यातही, माझ्या पालकांच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनाने मी आज आहे अशी व्यक्ती बनण्यास मदत केली. या आव्हानात्मक काळात आपल्या पालकांना आपली नेहमीपेक्षा जास्त गरज आहे. या कठीण काळात त्यांची काळजी घेणे आणि आधीपेक्षाही अधिक जबाबदारी आपल्यावर आहे."

पाहा सचिनची पोस्ट:

1994 मध्ये अमेरिकेत सर्वप्रथम पालक दिनाला सुरुवात झाली. यानंतर, दरवर्षी जगातील इतर देशांमध्ये पालकांचा सन्मान करण्यासाठी पालक दिन साजरा केला जातो. भारत आणि अमेरिकेत जुलैच्या शेवटच्या रविवारी पालक दिन साजरा केला जातो. पालक होणे ही सार्वत्रिक अनुभवांपैकी एक आहे, परंतु ती दिसते तितकी सोपे नाही. प्राचीन काळापासून पालकांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे.