भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीच्या पदासाठी उमेदवारांची अंतिम यादी शॉर्टलिस्ट केली आहे. यापूर्वी बीसीसीआयने निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) आणि पॅनेलचे सदस्य गगन खोडा (Gagan Khoda) यांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवले होते. निवड समितीच्या पाच सदस्यीय समितीच्या रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंचे नाव शामिल आहे. निवड समितीत प्रसाद आणि खोडा यांची जागा कोण घेणार याविषयी बरीच चर्चा सुरू झाली असली तरी बीसीसीआयने अखेर या दोन जागांसाठी चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, लक्ष्मण शिवरामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan), अजित आगरकर (Ajit Agarkar), व्यंकटेश प्रसाद (Vyankatesh Prasad) आणि राजेश चौहान (Rajesh Chauhan) या चार सदस्यांची निवड बीसीसीआयने केली आहे. क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) लवकरच या उमेदवारांची मुलाखत घेतील. मदन लाल, रुद्र प्रताप सिंह आणि सुलक्षणा नेल - सीएसीचे सदस्य उमेदवारांना व्यक्तिशः भेटतील. (भारताचे माजी स्टार फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन, राजेश चौहान आणि अमय खुरासिया BCCI निवड समितीच्या पदांसाठी भरले अर्ज)
नव्या घटनेनुसार विभागीय व्यवस्था काढून टाकली असली तरी, बीसीसीआय बॅलेन्सिंग अॅक्ट सुरू ठेवतं का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रसाद दक्षिण विभागातून निवडले गेले होते, तर पाच सदस्यीय निवड समितीमध्ये खोडा पश्चिम विभागाचे प्रतिनिधी होते. पुढील 10 दिवसांत मुलाखत प्रक्रिया होण्याची आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार मुख्य निवडकर्ता म्हणून 1983 ते 1986 पर्यंत 9 टेस्ट आणि 1985 ते 1987 दरम्यान 16 वनडे सामने खेळलेले माजी लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचे नाव आघाडीवर आहे.
दरम्यान, भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौर्यावर आहे. 21 फेब्रुवारीपासून 2 कसोटी सामने सुरू होतील. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकाविरुद्ध घरच्या मैदानावर वनडे मालिका खेळेल. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वीच नवीन निवडक दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टीम इंडियाची निवड करणार असल्याचे जाहीर केले होते. टीम इंडियाच्या निवडक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठीच्या नियमानुसार उमेदवाराला 7 टेस्ट आणि 30 प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव असणे आवश्यक आहे. याशिवाय, 10 वनडे सामने आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळणारे खेळाडूही अर्ज करू शकतात.