सुरेश रैना आणि इरफान पठाण यांनी इंस्टाग्राम लाईव्ह चॅट सत्रा दरम्यान खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. आयपीएलने फार कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव निर्माण केलं आहे. भारतीय तसेच परदेशी खेळाडूंमधेही या टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. भारतीय संघातील अनेक खेळाडूंनाही कधीकधी आयपीएल संघात जागा मिळत नाही. अशा खेळाडूंना परदेशी टी-20 लिग खेळण्याची परवानगी द्यावी अशी मागणी रैना आणि इरफानने केली. पण, बीसीसीआयच्या नियमांमुळे खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळत नाही. रैना आणि पठाणनंतर चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) माजी गोलंदाज मनप्रीत गोनी (Manpreet Gony) यानेही बीसीसीआयला (BCCI) अशा नियमांसाठी फटकार लावली आहे. गोनी म्हणाला की, संपूर्ण कुटुंबाचा खर्च घरगुती क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या पैशातून होत नाही. (इरफान पठाण, सुरेश रैना यांच्या ‘विदेशी क्रिकेटमधील क्रिकेटपटूंना परवानगी द्या’ च्या मागणीवर BCCI ने दिली 'ही' प्रतिक्रिया)
“बीसीसीआयशी संलग्न असणारे असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांना आयपीएलमध्ये संधी मिळाली तर ते भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करु शकतात. यानंतर काही खेळाडू असेही आहेत जे फक्त रणजी आणि स्थानिक क्रिकेट खेळतात पण त्यांना आयपीएल संघात जागा मिळत नाही. अशा खेळाडूंना परदेशी टी-20 लिगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली पाहिजे. यातून त्यांना पैसे मिळू शकतील. बीसीसीआयने त्यांना संधीच दिली नाही तर ते घर कसं चालवणार?? रणजी खेळून घर-परिवार चालत नाही.” गोनीने Sportskeeda संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत आपलं बिंदास मत मांडलं.
आयपीएलमधील बरेच स्टार परफॉरमर्स भारतीय क्रिकेट संघाकडून खेळत आहेत, तर असे इतर प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत ज्यांना घरगुती सर्किटमध्ये चांगली कामगिरी करूनही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. गोनीने 2 वनडे सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. दशकाहून अधिक काळ पंजाब क्रिकेटचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोनीने ग्लोबल टी-20 कॅनडा लीगमधील टोरोंटो नॅशनल संघाकडे जाण्यासाठी भारताच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.