PC-X

Jharkhand Train Accident: झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यात मंगळवारी पहाटे दोन मालगाड्यांच्या (Goods Train) धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वीज कंपनी एनटीपीसी द्वारे चालवल्या जाणाऱ्या दोन गाड्यांची टक्कर पहाटे 3 वाजताच्या सुमारास बरहेत पोलिस स्टेशन हद्दीतील भोगनाडीहजवळ झाली. ज्या ट्रॅकवर अपघात झाला तो ट्रॅक देखील एनटीपीसीच्या मालकीचा आहे. तो प्रामुख्याने त्यांच्या वीज प्रकल्पांमध्ये कोळसा वाहून नेण्यासाठी वापरला जातो.

 2 जणांचा मृत्यू, 4 जखमी

दोन्ही मालगाड्यांचे समोरासमोर झालेल्या धडकेत चालक मृत्युमुखी पडले आहेत. अशी माहिती साहेबगंज उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर तिर्की यांनी पीटीआयला दिली. ज्या रेल्वे मार्गावर हा अपघात झाला ती लाईन बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एनटीपीसीच्या कहलगाव सुपर थर्मल पॉवर स्टेशनला पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील फरक्का पॉवर प्लांटशी जोडली आहे.