भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय (BCCI)ने विश्वचषकनंतर टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची शोध सुरु केली आहे. यासाठी त्यांनी आवेदनही मागवली आहेत. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 30 जुलैपर्यंत अर्ज सादर केले जाऊ शकतात. भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा करार वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यानंतर संपणार आहे. परंतु शास्त्री यांना पुन्हा प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज करावा लागणार नाही. त्याच्या नावाची चर्चा निवडीदरम्यान होणारच आहे. दुसरीकडे, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी, भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. (टीम इंडियाच्या फील्डिंग कोच पदासाठी क्रिकेटविश्वातील या दिग्गज खेळाडूने केला अर्ज)
क्रिकेटनेक्स्टच्या एका रिपोर्टनुसार न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन (Mike Hesson) भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहे. मीडियाच्या माहितीनुसार हेसन भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी उत्सुक आहे आणि ते लवकरच आवेदन पाठवणार आहे. हेसन न्यूझीलंडच्या संघाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली न्यूझीलंड 2015 विश्वचषकच्या फायनलमध्ये पोहचले होते. हेसन यांनी आयपीएल (IPL) मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. आणि बीसीसीआयकडून देण्यात आलेल्या नवीन अटींनुसार आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभव हेसन यांच्याकडे आहे.
दुसरीकडे, फील्डिंग कोचसाठी दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि माजी मुंबई इंडियन्स कोच जॉन्टी रोड्स यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे. त्यांच्या शिवाय व्हीव्हीएस लक्ष्मण, न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग ,ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कालीस असल्याचे बोलले जात आहे.