मॅनचेस्टर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या विजयानंतर पाकिस्तानविरुद्ध दुसरा कसोटी सामना अनिर्णित दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे संकट कायम आहे. इंग्लंड (England)-पाकिस्तानमधील (Pakistan) दुसर्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ पावसाने धुवून काढला आणि केवळ 10.2 ओव्हरचा खेळ शक्य झाला ज्यामुळे 'मेन इन ग्रीन'ची मालिका जिंकण्याची आशा जवळजवळ संपली आहे. तिसर्या दिवशी पाऊस पडल्यानंतर पाकिस्तानने चौथ्या दिवशी 223/9 स्कोरपासून सुरुवात केली. पाकिस्तानने 5.2 ओव्हरमध्ये 13 धावांची भर घातली आणि मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) रूपात त्यांनी अखेरची विकेट गमावली. रिझवानने टीमकडून सर्वाधिक 72 धावा केल्या. स्टुअर्ट ब्रॉडने रिझवानला झॅक क्रॉलीकडे (Zak Crawley) कॅच आऊट केले. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्याच ओव्हरमध्ये रोरी बर्न्सची विकेट गमावली. (पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम आयपीएल खेळणार? इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण)
इंग्लंडने पहिल्या डावात पाच ओव्हरमध्ये एक विकेट गमावत सात धावा केल्या, ज्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला आणि पुन्हा सुरुवात होऊ शकला. चहाच्या वेळी अंपायरांनी खेळासाठी मैदान तयार करण्यास किमान तीन तास लागणार असल्याने दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. फक्त एक दिवस शिल्लक असताना इंग्लंडचा संघ अद्याप 229 धावांनी मागे आहे. पाकिस्तानकडून सलामी फलंदाज आबिद अलीने 60 आणि बाबर आझमने 47 धावा केल्या. इंग्लंडकडून ब्रॉड सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 56 धावा देऊन चार गडी बाद केले तर जेम्स अँडरसनने 60 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. इंग्लंडची सुरुवात खूपच खराब होती आणि डावाच्या चौथ्या चेंडूवर बर्न्स शाहिन शाह आफ्रिदीच्या चेंडूवर असद शफिक कडे झेलबाद झाला. पावसामुळे जेव्हा खेळ थांबला तेव्हा क्रोली पाच आणि डोम सिब्ली दोन धावा करून खेळत होते. स्विंग आणि सीम चेंडूसमोर दोघांनाही बर्याच समस्यांचा सामना करावा लागला.
मॅन्चेस्टर येथील सामन्यात इंग्लंडने 3 विकेटने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. 3 सामन्याच्या मालिकेतील अंतिम सामना शुक्रवार, 21 ऑगस्ट रोजी साऊथॅम्प्टनमध्ये खेळला जाईल.