ENG vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंडने हिशोब चुकता केला, नाट्यमय सामन्यात इंग्लंडचा पराभव करून मिळवले सलग तिसऱ्या फायनलचे तिकीट
डॅरिल मिशेल (Photo Credit: Twittter/BLACKCAPS)

आयसीसी टी-20 विश्वचषकच्या (ICC T20 World Cup) पहिल्या सेमीफायनल सामन्यात नाट्यमय पद्धतीने न्यूझीलंडने (New Zealand) इंग्लंडवर 5 विकेटने मात केली आणि सलग तिसऱ्या आयसीसी (ICC) स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. अबू धाबी (Abu Dhabi) येथे झालेल्या रोमांचक सामन्यात किवी संघाच्या विजयात अर्धशतकवीर डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) आणि जेम्स नीशम (James Neesham) यांनी निर्णायक भूमिका बजावली. मिशेलने नाबाद 72 धावा ठोकल्या तर नीशमने 10 चेंडूत 27 धावा केल्या. याशिवाय डेव्हॉन कॉनवेने (Devon Conway) 38 चेंडूत 44 धावा ठोकल्या. यासह किवी संघाने दोन वर्षांपूर्वी वनडे वर्ल्ड कप फायनल सामन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवाचा हिशोब चुकता केला. दरम्यान किवींविरुद्ध लियाम लिव्हिंगस्टोन आणि क्रिस वोक्सने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तसेच आदिल रशीदने एक गाडी बाद केला.

आजच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात किवी कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली होती. मात्र मलान व मोईन अलीच्या फटकेबाजीपुढे न्यूझीलंडचे गोलंदाज हतबल झाल्याने तो निर्णय अयोग्य ठरला. पॉवर-प्लेमध्ये सर्वप्रथम जॉनी बेअरस्टो त्यानंतर 9 व्या शतकात जोस बटलरला बाद करून न्यूझीलंडने इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले होते. मात्र मोईन अली व डेविड मलानच्या तिसऱ्या विकेटसाठी 63 धावांच्या भागीदारीने संघाचा डाव सावरला. या दरम्यान दोघांनी स्टार किवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि आक्रमक फटके खेळले. तथापि अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या मलानला बाद करून टिम साऊदीने मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. मलानने 30 चेंडू 41 धावा केल्या. शेवटच्या षटकात इंग्लंडने लिव्हिंगस्टोनची विकेट गमावली. याच षटकात मोईन अलीने अर्धशतक पूर्ण केले. त्याने 3 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 51 धावा ठोकल्या.

प्रत्युत्तरात न्यूझीलंडने मार्टिन गप्टिलला गमावले. त्यानंतर विल्यम्सनही अधिक काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. कॉन्वेने आणि मिशेलने तिसऱ्या गडीसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या. पण मोक्याच्या क्षणी कॉन्वे बाद झाल्याने इंग्लंडला मोठे यश मिळाले. पण सलामीवीर मिशेल आणि जेम्स नीशमने धमाकेदार फलंदाजी करून संघाला सलग तिसऱ्या वर्ल्ड कप फायनल सामन्यात पोहोचवले. यापूर्वी न्यूझीलंड संघ 2019 एकदिवसीय वर्ल्ड कप आणि आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियन 2021 फायनल सामना खेळला होता. यापैकी त्यांनी टेस्ट चॅम्पियनशिपचा मान मिळवला होता. आणि त्यांची नजर टी-20 चॅम्पियन बनण्याकडे असेल.