
न्यूझीलंड (New Zealand) आणि यजमान भारत (India) यांच्यातील चालू मालिका संपल्यानंतर भारतीय स्पीड मर्चंट दीपक चाहर (Deepak Chahar) आणि प्रमुख फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत 'अ' (India A Tour of South Africa) संघात सामील होणार आहेत. टिम साउदीच्या नेतृत्वातील न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाच्या (Team India) तिसऱ्या आणि शेवटच्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज व स्टार फलंदाज ब्लोमफॉन्टेनसाठी (Bloemfontein) रवाना होणाऱ्या भारत ‘अ’ संघासोबत प्रवास करतील. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया रविवारी ईडन गार्डन्सवर ब्लॅक कॅप्सवर विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या प्रयत्नात असेल. प्रियांक पांचाळच्या नेतृत्वात भारत ‘अ’ संघाने आफ्रिकी संघाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ब्लूमफॉन्टेनला पोहोचला आहे. बीसीसीआयने यापूर्वी न्यूझीलंड व्हाईट-बॉल मालिकेसाठी संघाची घोषणा करताना भारत ‘अ’ संघाची घोषणा केली होती. (India tour of South Africa 2021-22: भारत ‘अ’ विरुद्ध मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाची घोषणा)
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, चेतन शर्माच्या नेतृत्वातील निवड समितीने 9 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या 14 सदस्यीय संघात किशन आणि चाहर हनुमा विहारीसोबत सामील झाले आहेत. उपेंद्र यादव व्यतिरिक्त, किशन हा दक्षिण आफ्रिका मालिकेत पांचालच्या नेतृत्वातील संघासाठी विकरकीपिंगचा दुसरा पर्याय असेल. चाहर आणि किशन 24 नोव्हेंबर रोजी मुंबईतुन ब्लोमफॉन्टेनला रवाना होतील. तसेच गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूर देखील संघात सामील होण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे. किशन संघातील दुसरा यष्टिरक्षक बनण्यासाठी सज्ज असताना, वेगवान गोलंदाज चाहर सहकारी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी, उमरान मलिक, ईशान पोरेल आणि अरजान नागवासवाला यांना साथ देताना दिसेल.
दरम्यान, पांचालच्या नेतृत्वात भारत ‘अ’ संघ यजमान दक्षिण आफ्रिकेशी चार सामन्यांमध्ये भिडेल. आणि सर्व सामने ब्लोमफॉन्टेन येथे खेळले जातील. मालिकेचा पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 29 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी मधल्या फळीतील फलंदाज विहारीला दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारत ‘अ’ संघात स्थान देण्यात आले होते. न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेसाठी कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या विहारीला या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या भारत ‘अ’ संघातही स्थान देण्यात आले नव्हते.