मार्कस स्टोइनिस (Photo Credit: Instagram/DelhiCapitals)

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे आयपीएलच्या (IPL) 13 व्या हंगामातील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात पंजाबनं टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही आणि टीमला 20 ओव्हरमध्ये 157 धावाच करता आल्या. पंजाबच्या गोलंदाजांनी कर्णधार केएल राहुलचा निर्णय योग्य ठरवलं, पण मार्कस स्टोइनिसने (Marcus Stoinis) तुफान फटकेबाजी केली आणि सामनाच बदलून टाकला. स्टोइनिसने 20 चेंडूत अर्धशतकी खेळी करत दिल्लीला 157 पर्यंत मजल मारून दिली. दिल्लीने 96 धावांवर 6 विकेट गमावले असताना स्टोइनिसने आपले डोकं शांत ठेवून धमाकेदार डाव खेळला. स्टोइनिसने केवळ 21 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. त्याला राहुल व निकोलस पुरनने धावबाद केले. परंतू धावबाद होण्यापुर्वी त्याने एका खास विक्रमाची बरोबरी केली. दिल्लीकडून तिसरे वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम आता स्टोइनिसच्या नावावर झाला आहे. (DC vs KXIP, IPL 2020: मोहम्मद शमी जबरदस्त गोलंदाजी; मार्कस स्टोइनिसच्या अर्धशतकाने दिल्लीचे पंजाबला 158 धावांचे आव्हान)

स्टोइनिसने 20 चेंडूत हा कारनामा केला आणि माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) विक्रमाची बरोबरी केली. वीरूने 2012 आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध20 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. दिल्लीकडून सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा कारनामा क्रिस मॉरीसने केला. मॉरीसने 2016मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध 17 चेंडूत, तर रिषभ पंतने दिल्लीकडून 2019 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 18 चेंडूत हा पराक्रम केला होता.

पहिले फलंदाजी करत दिल्लीची चांगली सुरुवात झाली नाही. सलामी जोडी पृथ्वी शॉ आणि शिखर धवनमध्ये विसंगतीमुळे धवन शून्यावर धावबाद झाला. त्यांनतर लगेचच पुढील ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने पृथ्वीला 5 धावांवर माघारी धाडले. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतने डाव सांभाळला, पण रवी बिश्नोईने दोघांची जोडी मोडली आणि पंतला बाद केले. श्रेयस आणि पंतमध्ये 76 धावांची भागीदारी झाली. पंत पाठोपाठ श्रेयस देखील परतला आणि नंतर दिल्लीची घसरगुंडी सूरच राहिली. श्रेयसने 32 चेंडूत 39 धावा केल्या तर, पंतने 29 चेंडूत 31 धावा केल्या. अखेरीस स्टोइनिसने फटकेबाजी केली आणि दिल्लीला 157 पर्यंत मजल मारून दिली.