DC vs CSK, IPL 2020: शिखर धवनचा मास्टर स्ट्रोक! 'गब्बर'च्या शतकाने दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 5 विकेटने केली मात
शिखर धवन (Photo Credit: PTI)

DC vs CSK, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दिलेल्या 180 धावांच्या प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) तीन वेळा आयपीएल विजेत्यांवर वर्चस्व गाजवले आणि 5 विकेटने विजय मिळवत गाडी रुळावर आणली. सीएसकेने (CSK) दिलेल्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) स्पर्धेतील पहिल्या शतच्या जोरावर डीसीने (DC) सहज विजय मिळवला. धवनने 58 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 108 धावा केल्या. धवनला वगळता कॅपिटल्ससाठी अक्षर पटेल (Axar Patel) 4 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या, कर्णधार श्रेयस अय्यरने 23 आणि मार्कस स्टोइनिसने 24 धावांचे योगदान दिले. सलामी फलंदाजी पृथ्वी शॉ भोपळाही न फोडता माघारी परतला. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. दुसरीकडे, सीएसकेच्या पराभवाचे सत्र सुरूच आहे. सीएसकेसाठी दीपक चाहरने सर्वाधिक 2 तर सॅम कुरन, ड्वेन ब्रावो, शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. सीएसकेचा आजचा हा सातवा पराभव होता. यासह सुपर किंग्सची प्ले-ऑफ गाठण्याच्या शक्यता कमी होताना दिसत आहे. (DC vs CSK, IPL 2020: आयपीएलमध्ये 50 विकेट घेणार कगिसो रबाडा सर्वात वेगवान गोलंदाज, दिग्गजांना मागे टाकून केली कमाल)

चेन्नईविरुद्ध फलंदाजीला आलेल्या दिल्लीला चाहरने सलामी फलंदाज पृथ्वी शॉला पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर बाद करून धक्का दिला. अजिंक्य रहाणेला सतत संधी मिळत आहेत, पण तो स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरत आहे. सीएसकेविरुद्ध त्याने अवघ्या 8 धावा केल्या आणि चाहरच्या चेंडूवर सॅम कुरनकडे कॅच आऊट झाला. त्यानंतर धवनने कर्णधार श्रेयस अय्यर समवेत अर्धशतकी भागीदारी करून डाव पुढे नेला. या दरम्यान धवनने दुसरे अर्धशतक ठोकले. मात्र, नंतर अय्यर 23 धावांवर ब्रावोने त्याला डु प्लेसिसकडे झेलबाद केले. स्टोइनिसने देखील धवनसह चांगला डाव खेळला, फटका मारण्याच्या प्रयत्नात 24 धावांवर शार्दूल ठाकूरने त्याला अंबाती रायुडूच्या हाती कॅच आऊट केले. अ‍ॅलेक्स कॅरी 4 धावा करून परतला. धवनने चेंडूत आयपीएलमधील पहिले अर्धशतक ठोकले. यानंतर धवनने 57 चेंडूत आयपीएलमधील पहिले शतक ठोकले. या दरम्यान त्याने 14 चौकार आणि एक षटकार मारला.

यापूर्वी फाफ डु प्लेसिसचे अर्धशतक, डेथ ओव्हर्समध्ये अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांच्या फटकेबाजीने सीएसकेला 179 धावांपर्यंत मजल मारून दिली. पण, गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे सुपर किंग्सला पुन्हा एकदा लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले.