CSK vs SRH IPL 2021 Match 22: चेन्नईचा विजयी ‘पंच’, रुतुराज गायकवाड-फाफ डु प्लेसिसचे मॅच विनिंग अर्धशतकाने हैदराबादवर 7 विकेट्सने मात
फाफ डु प्लेसिस आणि रुतूराज गायकवाड (Photo Credit: Twitter/@IPL)

CSK vs SRH IPL 2021: फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) आणि रुतुराज गायकवाडच्या  (Ruturaj Gaikwad) धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने  (Chennai Super Kings) आयपीएलच्या (IPL) 22 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. हैदराबादचा 6 सामन्यांपैकी हा पाचवा पराभव ठरला आहे तर चेन्नईचा सहा सामन्यातील पाचवा सामना जिंकला आहे. हैदराबादने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात चेन्नईने 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून सनरायझर्सना लोळवलं. रुतुराजने सर्वाधिक 75 धावा केल्या तर फाफ डु प्लेसिसने 56 धावांचे योगदान दिले. सुरेश रैना 17 धावा आणि रवींद्र जडेजा 7 धाव करून नाबाद राहिले. दुसरीकडे, हैदराबादसाठी एकटा राशिद खान गोलंदाजीने प्रभावित करू शकला. हैदराबादच्या या युवा फिरकीपटूने 3 विकेट काढल्या. (CSK vs SRH in IPL 2021: आयपीएलमध्ये 50 अर्धशतक ठोकणारा David Warner ठरला पहिला क्रिकेटर, केला विक्रमांचा भडीमार)

हैदराबादने दिलेल्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात रुतुराज-डु प्लेसिसच्या जोडी संघाला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी हैदराबाद गोलंदाजांवर हल्लाबोल करत पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान, डु प्लेसिस आणि गायकवाडने शानदार अर्धशतक पूर्ण केलं. दोघे एकहाती संघाला विजय मिळवून देत असे दिसत असताना राशिद खानने चेन्नईला दमदार सुरुवातीनंतर पहिला धक्का दिला. फटकेबाजी करत असलेल्या गायकवाडला खानने बोल्ड केलं. रुतुराजने 44 चेंडूत 12 चौकारांसह 75 धावांची शानदार खेळी केली. त्यांनतर खानने मोईन अलीला केदार जाधवच्या हाती कॅच आऊट करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. निर्णायक क्षणी पुन्हा एकदा राशिद खानने आपल्या फिरकीच्या जोरावर चेन्नईला तिसरा झटका दिला आणि अलीपाठोपाठ फॅफ डु प्लेसिसला तंबूचा रस्ता दाखवला. मात्र, अखेरीस रैना-जडेजाच्या जोडीने संघाला विजयीरेष ओलांडून दिली.

यापूर्वी, टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्ससाठी मनीष पांडेने 61 धावांची खेळी केली. तर कर्णधार डेविड वॉर्नरने 57 धावा केल्या. शिवाय, केन विलियमनसनने 26 धावांची छोटेखानी खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली पण गोलंदाजांच्या अपयशामुळे संघ दुसरा विजय मिळवण्यात अपयशी ठरला.