CSK vs DC IPL 2021 Match 2: शिखर धवनचे धमाकेदार अर्धशतकाने दिल्लीची झोक्यात सुरुवात, चेन्नईवर 7 विकेट्सने केली मात
शिखर धवन (Photo Credit: PTI)

CSK vs DC IPL 2021 Match 2: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 7 विकेट्सने चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) मात करत 14व्या हंगामाची झोक्यात सुरुवात केली आहे. सुपर किंग्सने दिलेल्या 189 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीने ओपनर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) धमाकेदार 85 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई गोलंदाजांची धुलाई करत 3 विकेट गमावून विजय मिळवला. दिल्लीकडून पृथ्वी शॉने 72 तर कर्णधार रिषभ पंतने नाबाद 15 धावांचे योगदान दिले. मार्कस स्टोइनिसने 14 धावा केल्या. दुसरीकडे, चेन्नई गोलंदाज आजच्या सामन्यात दिल्लीच्या आघाडीच्या फलंदाजांपुढे निरुत्तर दिसले. चेन्नईकडून शार्दूल ठाकूर 2 तर ड्वेन ब्रावोला 1 विकेट मिळाली. अशाप्रकारे दिल्लीने यंदाच्या आयपीएलची सुरुवात विजयाने केली तर चेन्नईला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. (IPL 2021: CSK कॅप्टन MS Dhoni दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कमबॅक सामन्यात ‘गोल्डन डक’चा शिकार, 2015 नंतर पहिल्यांदा भोपळा न फोडता परतला माघारी)

चेन्नईने पहिले फलंदाजी करून दिलेल्या विशाल धावसंख्येचा लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीसाठी पृथ्वी आणि धवनने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. दोघांनी सुपर किंग्स गोलंदाजांची धुलाई करत संघावरील दबाव कमी केला आणि पहिल्या विकेटसाठी 138 धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान सामन्यातील पाचव्या आणि शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये शॉने हल्लाबोल केला आणि सलग तीन चौकार लगावत 17 धावा वसूल केल्या. शॉने यंदाच्या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावलं. शॉपाठोपाठ शिखर धवनने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, ब्रावोच्या गोलंदाजीवर हवेत फटका खेळत पृथ्वी झेलबाद होऊन माघारी परतला आणि दोघांमधील भागीदारी तुटली. अखेरीस शार्दूलने धवनला एलबीडब्ल्यू आऊट करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं.

दरम्यान, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आजच्या सामन्यात चेन्नईकडून मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने सर्वाधिक 54 धावा केल्या. मोईन अलीने 36 तर सॅम कुरनने 34 धावांचे योगदान आले. दिल्लीकडून आवेश खान आणि क्रिस वोक्स यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या.