Manish Pandey-Ashrita Shetty Wedding (Photo Credit Instagram)

टीम इंडियाचा फलंदाज आणि कर्नाटकचा कर्णधार मनीष पांडे (Manish Pandey) आज विवाहबंधनात अडकला आहे. मनीषने सोमवारी दक्षिण भारतीय अभिनेत्री आश्रिता शेट्टीशी (Ashrita Shetty) लग्न केले. या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये मनीष पांडे सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझी संघाकडूनच खेळत आहे. मनीषच्या नेतृत्वात कर्नाटकने रविवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूचा पराभव केला. या सामन्यात मनीषने 60 धावांची खेळी केली. मनीष आणि आश्रिताचा विवाहसोहळा मुंबईमध्ये पार पडला.

16 जुलै 1993 रोजी आश्रिताचा जन्म झाला. 2010 साली ब्युटी कॉन्टेस्ट 'क्लीन अँड क्लीअर फ्रेश फेस' जिंकल्यानंतर तिने तेलिकेडा बोल्ली नावाच्या तुलू चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मनीष आणि आश्रिता गेले काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. आज त्यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नासाठी अनेक क्रिकेटर आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. (हेही वाचा: Syed Mushtaq Ali Trophy: मनीष पांडे याचा धमाका, Services विरुद्ध षटकार आणि चौकारांसह ठोकले तुफानी शतक)

मनीष पांडे मूळचा उत्तराखंडचा आहे. त्याचा जन्म 10 सप्टेंबर 1989 रोजी नैनितालमध्ये झाला. मनीषने सैन्यात भरती व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, मात्र मनीषला क्रिकेटपटू व्हायचे होते. शाळेत असल्यापासूनच क्रिकेटमधील त्याचा रस वाढला. 2008 मध्ये, त्याची निवड भारताच्या अंडर-19 संघात झाली होती, ज्याचा कर्णधार विराट कोहली होता. या संघाने मलेशियामध्ये आयोजित विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर मनीष मुंबईकडून आयपीएलमध्ये सामील झाला. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.