लॉकडाऊनच्या काळात भारत-पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' तारखेपासून Star Sports वर पाहायला मिळणार IND vs PAK वर्ल्ड कप सामने
विराट कोहली आणि सरफराज अहमद (Photo Credit: Getty Images)

भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट सामना पाहण्यासाठी दोन्ही देशांमधील चाहते नेहमीच तत्पर असतात. आजवर दोन्ही देशातील क्रिकेट संघात थरारक सामने पाहायला मिळाले आहेत. काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जात नसली तरी आयसीसी स्पर्धेत हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने आलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत. भारत-पाकिस्तानमधील सामन्यांना आजही आपल्या आठवणींच्या संग्रहात अजूनही विशेष स्थान आहे. कोरोना व्हायरसचा विस्तार होत असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. अशा स्थितीत क्रीडा स्पर्धा होत नसल्याने स्टार स्पोर्ट्स 1 (Star Sports 1) आपल्या चाहत्यांशी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व सामन्यांची ट्रीट घेऊन येत आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चॅनेल भारत-पाकमधील 50 ओव्हरचे वर्ल्ड कपचे (World Cup) पूर्ण सामने प्रसारित करणार आहे. याची सुरुवात 4 एप्रिलपासून होणार आहे.

पहिला सामना सिडनी क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तानमधील 1992 वर्ल्ड कप सामान्यापासून होईल. या सामन्यात युवा सचिन तेंडुलकरने अर्धशतक झळकावले आणि नाबाद परतला. भारताने 216 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात कपिल देव, मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथच्या गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तान 173 धावांवर ऑलआऊट झाला. या लॉकडाऊनच्या काळात स्टार स्पोर्ट्स 1 1992 पासून इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 पर्यंत सर्व सामने प्रसारित करणार आहे.

भारत-पाकमधील वर्ल्ड कप सामन्यात टीम इंडियाने प्रतिस्पर्धी टीमवर आजवर अजिंक्य असा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. अशा स्थितीत भारतीय चाहत्यांसाठी ही एक मोठी ट्रीटच सिद्ध होईल. दोन्ही देशातील क्रिकेट टीम पहिल्यांदा 1992 च्या वर्ल्ड कप दरम्यान आमने-सामने आले होते. दोन्ही टीममध्ये आजवर 7 वेळा टक्कर झाली आणि यामध्ये भारताने पाकिस्तानला लज्जास्पद पराभव पत्करायला भाग पडले. 2019 मधील भारतविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानी संघाला अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.