चेतन शर्मा यांनी ( Chetan Sharma) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय (BCCI) मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला आहे. एका वृत्तसंस्थेने केलेल्या कथीत स्टींग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा (Chetan Sharma Resigns) विविध मुद्द्यांवर भाष्य करताना आढळून आले होते. ज्यात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील संबंधांवरही भाष्य केले गेले होते. या स्टिंग ऑपरेशनची प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चा सुरु होती.
बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता म्हणुन चेतन शर्मा यांची पाठिमागील महिन्यातच पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मध्येच एक स्टिंग ऑपरेशन बाहेर आले आणि चेतन शर्मा यांच्या एकूण वाटचालीला ब्रेक लागला. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, चेतन शर्मा यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे आपला राजीनामा शुक्रवारी पाठवला.
ट्विट
BCCI chief selector Chetan Sharma resigns from his post. He sent his resignation to BCCI Secretary Jay Shah who accepted it.
(File Pic) pic.twitter.com/1BhoLiIbPc
— ANI (@ANI) February 17, 2023
दरम्यान, चेतन शर्मा स्टिंग ऑपरेशन दरम्यान विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह सारख्या खेळाडूंवर टीका करताना आढळून आले होते. झी न्यूजच्या स्टिंग दरम्यान शर्मा यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्याशी झालेल्या अंतर्गत चर्चाही उघड केल्या होत्या. ज्या त्यांना भारी पडल्या. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील T20 विश्वचषकातील भारताच्या कामगिरीनंतर हटवल्यानंतर बीसीसीआयने नुकतेच शर्मा यांना पुन्हा नियुक्त केले होते.