माजी भारतीय क्रिकेटर चेतन चौहान (Photo Credit: PTI)

भारताचे माजी क्रिकेटर आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान (Chetan Chauhan) यांची किडनी निकामी झाल्याने वैद्यकीय प्रकृती खालावली आणि गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात (Medanta hospital) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले गेले आहेत. जुलै महिन्यात चौहान यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) टेस्ट सकारात्मक आढळली होती, ज्यानंतर त्यांना लखनऊच्या संजय गांधी पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौहान कोविड-19 (COVID-19) मधून बरे झाले नव्हते, जेव्हा शुक्रवारी त्यांना किडनी आणि रक्तदाबाची समस्या उद्भवली, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला लाईफ सपोर्टवर ठेवण्याचा निर्णय घेतला. जवळजवळ महिनाभरापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण शुक्रवारी रात्री त्यांची तब्येत आणखी खालावली. दोन वेळा माजी लोकसभा खासदार चौहान, हे व्हायरसची लागण झालेल्या काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंपैकी एक आहेत.

72 वर्षीय क्रिकेटपटूंच्या कुटुंबाचीही जुलै महिन्यात कोरोना टेस्ट करवण्यात आली आणि त्यांना होम-क्वारंटाइन करण्यात आले. चौहान यांचेकडे यूपीच्या मंत्रिमंडळात सैनिक कल्याण, गृहरक्षक, पीआरडी आणि नागरी सुरक्षा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या वर्षापर्यंत त्यांनी राज्याचे क्रीडामंत्री म्हणून काम पाहिले. हुशार खेळाडू म्हणून परिचित असलेल्या चौहानने 1969 and ते 1978 दरम्यान 40 कसोटी सामने खेळले आणि 31.57 च्या सरासरीने 2084 धावा केल्या. 97 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यांनी सात वनडे सामने खेळले आणि 153 धावा केल्या. चौहान, 70 च्या दशकात भारतीय क्रिकेट संघाचे नियमित सदस्य होते.

चौहान यांनी वयाच्या 22 व्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध 1969 मध्ये डेब्यू केला होता. 1970च्या दशकात त्यांनी अनेक कसोटी सामन्यांमध्ये सुनील गावस्करसोबत यशस्वी सलामीची भागीदारी रचली आणि 10 शतकी भागीदारीसह 3000 धावा जोडल्या. चेतन चौहानने महाराष्ट्र आणि दिल्लीकडून रणजी ट्रॉफी खेळली आणि 1981 मध्ये अर्जुन पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. चौहान, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील होते. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर चौहान पूर्णवेळ राजकारणी झाले आणि 1990 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडून लढवली. त्यानंतर, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजयानंतर ते उत्तर प्रदेशच्या राजकीय भूमिकेत परतले.