चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Instagram)

Chennai Super Kings Playing XI: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात येणार आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या हंगामाचा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. स्पर्धेचा पहिलाच सामना हाय-व्होल्टेज असणार आहे, जिथे महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघ पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना करेल. सीएसकेसाठी (CSK) चिंतेची बातमी म्हणजे फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) दुखापतग्रस्त आहे आणि तो युएई येथे संघाच्या पहिल्या सामन्यातून बाहेर बसू शकतो. तसेच बुधवारी दुबईला पोहोचलेल्या सॅम कुरानच्या (Sam Curran) खेळण्यावरही शंका कायम आहे. अशास्थितीत दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात माही कोणत्या अकरा खेळाडूंसोबत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतो याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. (Mumbai Indians Playing XI vs CSK: रोहित शर्मासमोर प्लेइंग इलेव्हनचा पेच, पहिल्या सामन्यात असे असू शकते मुंबई इंडियन्सचे संभाव्य 11)

भारतात आयोजित आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात डु प्लेसिस उत्कृष्ट लयीत होता आणि त्याने रुतुराज गायकवाडसह संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. अशा स्थितीत, फाफच्या अनुपस्थितीत, रॉबिन उथप्पा पहिल्यांदा पिवळ्या जर्सीमध्ये मैदानावर दिसू शकतो. उथप्पा गायकवाडला चेन्नईचा सलामीवीर म्हणून साथ देऊ शकतो. याशिवाय मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर आपले काम चोख बजावत आहे आणि धोनीला त्याच्या जागी छेडछाड करायची नाही. चौथ्या क्रमांकावर सुरेश रैना यूएईमध्ये मैदान गाजवायला नक्कीच उत्सुक असेल. अंबाती रायुडूने मधल्या फळीत त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने प्रभावित केले आहे. अष्टपैलू म्हणून पूर्वार्धात फलंदाजी आणि चेंडू या दोन्हींचा थरकाप उडवणारा रवींद्र जडेजा प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. मात्र, धोनी स्वतःला जडेजाच्या वर बढती देतो की नाही हे पाहणे रंजक ठरेल.

दुसरीकडे, गोलंदाजी विभागात जर सॅम कुरन क्वारंटाईनमध्ये असेल, तर त्याला पहिल्या सामन्यात खेळणे कठीण आहे. धोनी कुरनच्या जागी जोश हेजलवूडचा अनुभव वापरू शकतो. हेझलवूडने गेल्या काही मालिकांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. तसेच भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चाहरला पॉवरप्लेमध्ये आपले काम पार पाडणे चांगले माहीत आहे. इंग्लंडच्या भूमीवर छाप पाडणारा शार्दुल ठाकूर दिपकला साथ देताना दिसेल. त्याचबरोबर लुंगी एनगिडी किंवा इमरान ताहिर यांना संधी मिळू शकते. दरम्यान, भारतात दोन्ही संघात झालेल्या मुकाबल्यात मुंबईने रोचक विजय मिळवून चेन्नईला धूळ चारली होती. त्यामुळे युएईमध्ये पहिल्या सामन्यात सीएसकेला पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

चेन्नई सुपर किंग्जचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रुतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कॅप्टन), शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेजलवूड, लुंगी एनगिडी/इमरान ताहिर.