विदर्भाला (Vidarbh) दोनदा रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) आणि दोन वेळा इराणी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावणारे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) यांनी संघाची साथ सोडली आहे. आणि आता पंडितचा चांगला मित्र आणि अनुभवी फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer), ज्याने नुकतंच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली तो विदर्भचा प्रशिक्षक म्हणून पंडित यांची जागा घेऊ शकतो. पंडितबरोबर जाफरने विदर्भाचे भविष्य बदलले. जाफर आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या वर्षात विदर्भाकडून क्रिकेट खेळला. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) सूत्रांनी सांगितले की, जाफर यांनी निवृत्तीनंतर कोचिंगची इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे विदर्भाशी खास नातं राहिलं आहे आणि म्हणूनच संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची विदर्भात परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, खेळाडूंमध्ये त्याच्याबद्दल मोठा आदर आहे. यावर्षी पंडित सलग तिसऱ्यांदा विदर्भाला विजयि संघ बनवू शकले नसले तरी ते विदर्भाचा भविष्य बदलेले प्रशिक्षक म्हणून मानले जातात. ते त्यांच्या कठोरपणासाठी ओळखले जातात.
क्रिकइन्फो या वेबसाइटला पंडित यांनी सांगितले की, “मी तीन वर्षे विदर्भला प्रशिक्षण दिले. मी सहसा दोन किंवा तीन वर्षे एका टीमबरोबर असतो. नवीन आव्हाने स्वीकारण्यात मजा येते." ते म्हणाले, "मी विदर्भाने आनंदी आहे यात काही शंका नाही. संघ ज्या पद्धतीने खेळला, संघाने ज्या प्रकारे मला पाठिंबा दर्शविला आहे… दुसरे काही नाही पण मला पुढे जायचे होते.” मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (MPCA) अधिकाऱ्याने पुढच्या सत्रात पंडित यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याची पुष्टी केली आहे.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार पंडित यांच्या जागी वसीम जाफर प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतो. जाफरने यापूर्वी बांग्लादेश संघासह फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. आणि इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबने त्यांना फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात समाविष्ट केले आहे. जाफरच्या नियुक्तीवर अजून विदर्भ बोर्ड आणि त्यांनी स्वतः कोणतीही पुष्टी केली नाही आहे. दुसरीकडे, सध्या जगभरातील सर्व क्रिकेट स्पर्धा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.