भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (ODI) झिम्बाब्वेचा 5 विकेट्सने (IND vs ZIM) पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या धमाकेदार कामगिरीनंतर टीम इंडिया (Team India) पाकिस्तानच्या (Pakistan) विश्वविक्रमाच्या अगदी जवळ आली आहे. वास्तविक, झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) सर्वाधिक एकदिवसीय सामने (ODI Match) जिंकण्याचा हा विक्रम आहे. 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक विजय नोंदविण्याच्या बाबतीत भारत आता पाकिस्ताननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता दोन्ही संघांमध्ये केवळ एका विजयाचा फरक आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाने या धावसंख्येचा पाठलाग 25.4 षटकांत केला.
झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधला भारताचा हा 53 वा विजय आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने या संघाची सर्वाधिक धुलाई केली आहे. पाकिस्तानने या फॉरमॅटमध्ये 54 वेळा झिम्बाब्वेचा पराभव केला आहे. टीम इंडियाने मालिकेतील शेवटच्या सामन्यात यजमानांना हरवले तर पाकिस्तानशी बरोबरी साधली जाईल. या यादीत बांगलादेश 51 विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकणारा संघ-
पाकिस्तान - 54
भारत - 53
बांगलादेश - 51
श्रीलंका - 46
पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी कर्णधार केएल राहुलने दुसऱ्या सामन्यात शिखर धवनसोबत फलंदाजीच्या सरावासाठी डावाची सुरुवात केली पण दुसऱ्याच षटकात व्हिक्टर न्युचीने पाच चेंडूत एक धावा काढून त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले, त्यानंतर धवन आणि गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी खेळी झाली. 29 चेंडूत 42 धावांची शानदार भागीदारी झाली. (हे देखील वाचा: IND vs ZIM 2nd ODI: संजू सॅमसनला पहिल्यांदाच मिळाला 'हा' पुरस्कार, सामन्यानंतर म्हणाला- मी फलंदाजी आणि यष्टिरक्षणाचा घेत आहे आनंद)
तसेच, दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांनी पाचव्या विकेटसाठी 58 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. हुड्डा 36 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. यानंतर संजू सॅमसनने 26व्या षटकात षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. सॅमसनने 39 चेंडूत 43 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले.