IND vs BAN: भारतीय संघासाठी सर्व काही ठीक चालले नसून त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवरही दिसून येत आहे. टी-20 विश्वचषकातील खराब प्रदर्शनानंतर, भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंड (New Zealand) आणि आता बांगलादेशमध्येही (Bangladesh) एकदिवसीय मालिका गमावली आहे. सलग दोन मालिका गमावल्यानंतर आता पुढील वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भारतीय संघासाठी खेळाडूंच्या कामगिरीव्यतिरिक्त, त्यांची दुखापत आणि फिटनेस ही देखील सर्वात मोठी समस्या आहे, अशा परिस्थितीत, आगामी काळात नवीन निवडकर्त्यांसह भारतीय क्रिकेटमध्ये बरेच बदल अपेक्षित आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनीही आता याकडे लक्ष वेधले आहे.
जानेवारीपासून संघ होईल मजबूत
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 5 धावांनी पराभव आणि मालिका गमावल्यानंतर द्रविडने पत्रकार परिषदेत सांगितले की, आमच्या दृष्टिकोनातून खेळणे इतके सोपे नव्हते. आमच्याकडे पूर्ण टीम नव्हती. आम्हाला आशा आहे की जानेवारीपासून आम्हाला घरच्या मालिका खेळण्यासाठी पूर्ण संघ मिळेल, परंतु ते दुखापतींवर अवलंबून असेल. आयपीएलपूर्वी आमच्याकडे नऊ एकदिवसीय सामने आहेत (तीन न्यूझीलंडविरुद्ध, तीन श्रीलंकेविरुद्ध आणि तीन ऑस्ट्रेलियाविरुद्ध) आणि आम्हाला आशा आहे की या सामन्यांसाठी आम्हाला एक स्थिर संघ मिळेल.
दोन वर्षांत टी-20 ला खूप दिले प्राधान्य
द्रविड पुढे म्हणाले की, संपूर्ण संघाची अनुपस्थिती सोपी नाही. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत आम्ही टी-20 ला खूप प्राधान्य देत होतो कारण दोन विश्वचषक खेळायचे होते. येत्या आठ-दहा महिन्यांत आमची प्राथमिकता एकदिवसीय क्रिकेटला असेल. स्वरूपांशी जुळवून घेणे इतके सोपे नाही. कसोटी सामने खेळले जाणार असल्याने आमच्या पांढऱ्या चेंडूतील तज्ञांना थोडी विश्रांती मिळेल, असेही तो म्हणाला. (हे देखील वाचा: BCCI ने Team India चे आगामी होम सीरिजचे वेळापत्रक केले जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने)
अनेक वरिष्ठ खेळाडूंचे होऊ शकते पुनरागमन
विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी यांसारखे अनेक वरिष्ठ आणि स्टार खेळाडू एकतर दुखापतग्रस्त आहेत किंवा त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हे सर्व खेळाडू लवकरच संघात सामील होतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय अनेक खेळाडूंची पानेही कापली जाऊ शकतात.