कोरोना व्हायरसमुळे IPL 2020 अडचणीत; भारताने व्हिसा धोरण बदलल्याने परदेशी खेळाडूंच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह; निर्णय घेण्यासाठी 14 मार्च रोजी BCCI ची महत्वाची बैठक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Twitter @IPL/File)

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलवरही (IPL) आता कोरोना व्हायरसचे (Corona Virus) सावट दिसत आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता, आता राज्य सरकारही यासंदर्भात मोठी पावले उचलताना दिसत आहे. याआधी कर्नाटक सरकारने सामन्यांचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला, आता महाराष्ट्राने आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी तिकिटांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. सध्या तरी याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलची गव्हर्निंग कौन्सिल 14 मार्च रोजी कोरोना विषाणूबाबत परिस्थितीसंदर्भात बैठक घेणार आहे. या बैठकीत आयपीएल रद्द होणार की नाही याचा निर्णय घेतला जाईल.

29 मार्चपासून आयपीएल 2020 ला सुरुवात होणार आहे. पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. मात्र आता कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता, सरकार आयपीएलचे सामने पुढे ढकलणे किंवा रिकाम्या स्टेडियममध्ये आयोजित करण्याचा विचार करीत आहे. बीसीसीआयला आयपीएलद्वारे तिकिटांच्या व्यतिरिक्तही इतर स्त्रोतांमधून फायदा होतो. त्यामुळे तिकिटांची विक्री न करता जर का ते मोकळ्या स्टेडियमवर सामने भरवणार असतील, तर महाराष्ट्र सरकारकडून यासाठी परवानगी मिळू शकते.

यावर्षी बीसीसीआयसाठी आयपीएलचे सामने भरवणे अधिक कठीण होत आहे. वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताने व्हिसा धोरणात बदल केले आहेत, त्यामुळे खेळाडूंच्या अडचणी वाढल्या आहेत. आयपीएल खेळण्यासाठी भारतात येणार्‍या 60 परदेशी खेळाडूंना व्हिसा मिळेल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. काही महत्वाच्या श्रेणींमधील लोक वगळता, भारताने 15 एप्रिल पर्यंत परदेशी लोकांना देशात येण्यासाठी बंदी घातली आहे. येत्या काही दिवसांत बीसीसीआय त्यांची पुढील पावले काय असतील हे याबाबत माहिती देईल.