BCCI New Fitness Test: Yo-Yo नंतर बीसीसीआयने घेऊन आली नवीन फिटनेस टेस्ट, टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी आता करावे लागणार पास
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

BCCI New Fitness Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सध्या टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंच्या फिटनेसबाबत खूपच सक्रिय आहे आणि प्रत्येक खेळाडूला टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी यो-यो फिटनेस टेस्ट (Yo-Yo Test) पास करावी लागते. यो-यो टेस्टचे आगमन झाल्यापासून संघातील खेळाडूंची फिटनेस चांगली झाली आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या खेळात स्पष्टपणे दिसून येत आहे. संघात स्थान मिळविण्यासाठी अयोग्य व जादा वजन असलेल्या खेळाडूंना स्वत: ला फिट सिद्ध करावे लागते. या दरम्यान, बीसीसीआय 'टाइम ट्रायल टेस्ट' (Time Trial Test) नावाची नवीन फिटनेस टेस्ट घेऊन आली आहे आणि भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी आता खेळाडूंना यो-यो बरोबरच ही टेस्ट देखील पास करावी लागणार आहे. ‘टाइम ट्रायल टेस्ट’ मध्ये खेळाडूंचा वेग आणि सहनशीलता तपासली जाईल. या टेस्टमध्ये खेळाडूंना 2 किलोमीटरपर्यंत अंतर पूर्ण करावे लागणार आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, वेगवान गोलंदाजाला ही टेस्ट 8 मिनिट आणि 15 सेकंदात पूर्ण करावी लागेल, तर फलंदाज, फिरकी गोलंदाज आणि यष्टीरक्षकांना ही चाचणी 8 मिनिट 30 सेकंदात पूर्ण करावी लागेल. नवीन टेस्ट आल्याने यो-यो टेस्ट संपणार नाही, परंतु आता खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही टेस्टचे अडथळे पार करावे लागणार असेल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितले की, "मंडळाला असे वाटले की पुढच्या स्तरावर फिटनेस घेण्यात यावेळच्या फिटनेस मानकने मोठी भूमिका बजावली आहे. फिटनेस पातळी वेगळ्या स्तरावर नेणे महत्वाचे आहे. 'टाइम ट्रायल' व्यायामामुळे आम्हाला स्पर्धा अधिक चांगले होईल. बोर्ड दरवर्षी मानक वाढवत राहील." सौरव गांगुली आणि जय शहा यांच्याकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर बीसीसीआयच्या सर्व करारातील खेळाडूंना ही नवीन टेस्ट व ती उत्तीर्ण करण्याच्या निकषांविषयी माहिती देण्यात आली आहे.

ही टेस्ट फेब्रुवारी, जून आणि ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये घेण्यात येईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणाऱ्या खेळाडूंना फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या टेस्टमधून सूट देण्यात आली आहे, परंतु मर्यादित ओव्हरसाठी निवडलेल्या खेळाडूंना ही चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. विशेष म्हणजे विराट कोहली कर्णधार झाल्यापासून टीम इंडियाच्या फिटनेस पातळी लक्षणीय वाढ झाली आहे.