बीसीसीआय (Photo Credits: IANS)

भारताकडून  जाणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर ऑस्ट्रेलियन सरकारने बंदी घातली आहे. आज सकाळी हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर आयपीएल 2021 (IPL 2021) साठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा परतीचा मार्ग बंद झाला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने देखील मायदेशी परतण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी खुद्द खेळाडूंवर सोपवली आहे. त्यानंतर खेळाडूंना सुखरुप मायदेशी पोहचवण्याची जबाबदारी बीसीसीआयने (BCCI) आपल्या खांद्यावर घेत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्संना दिलासा दिला आहे.

ऑस्टेलियन सरकारच्या या घोषणेनंतर राजस्थान रॉयल्सचे एंड्रयू टाइ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे केन रिचर्डसन आणि एडम जंपा यांनी ऑस्ट्रेलियात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांनी खेळाडूंना पत्र लिहिले आहेत. त्यात ते म्हणातात, टुर्नामेंट संपल्यानंतर मायदेशी परतण्याबाबत तुम्हाला असलेली चिंता आम्हाला समजत आहे. आम्ही तुम्हाला सुखरुप ऑस्ट्रेलियामध्ये पोहचवू. याबाबत तुम्ही अजिबात काळजी करु नका. तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय मायदेशी परताल, याची संपूर्ण जबाबदारी बीसीसीआय घेत आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी सुखरुप परतत नाहीत तोपर्यंत बीसीसीआयसाठी हे टुर्नामेंट संपलेलं नसेल, असं म्हणत त्यांनी खेळाडूंना आश्वस्त केलं आहे.

मागील काही दिवसांपासून भारतामध्ये 3 लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. मृतांचा आकडा वाढला आहे. त्याचबरोबर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे भारतातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑस्ट्रेलियन सरकारने भारताकडून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू क्रिस लेन याने आयपीएल संपल्यानंतर खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी विशेष विमानाची सोय करावी, अशी मागणी ऑस्ट्रेयिन क्रिकेट बोर्डाकडे केली आहे.त्याचबरोबर प्रत्येक आयपीएल खेळाडूच्या मानधनाचा 10 टक्के हिस्सा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडे जात असल्याने यावर्षी ती रक्कम विशेष विमानासाठी वापरता येईल का, असा विनंतीपूर्वक सवालही त्याने केला आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने भारतात सुरु असलेल्या कोविड-19 संकटात मदत म्हणून पीएम केअर फंडमध्ये 50  हजार डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे. पॅट कमिन्स सध्या शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत आहे.