Ban नंतर शाकिब अल हसन याने फेसबुकवर शेअर केली भावनात्मक पोस्ट, चाहत्यांचे आभार मानत 2020 मध्ये बांग्लादेशकडून खेळण्यावर करणार लक्ष केंद्रित
Shakib Al Hasan (Photo Credits: Getty Images)

बांग्लादेश (Bangladesh) संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातली आहे. आयसीसीने शाकिबला दोन वर्षासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घातली आहे. दोन वर्षांची बंदी एक वर्षासाठी प्रभावी ठरणार आहे, कारण शाकिबने आयसीसी (ICC) समोर प्रामाणिकपणा दाखवल्याने माफी देण्यात आली आहे. क्रिकेट सट्टेबाजांनी त्याच्याकडे संपर्क केल्याची माहिती आयसीसी आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाशी (Bangladesh Cricket Board) लपवल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, बॅनच्या काही दिवसानंतर शाकिबने सोशल मीडिया साईट फेसबुकवर एक भावनात्मक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे शाकिबने चाहत्यांचे आभार मानले आणि आता त्याचे संपूर्ण लक्ष क्रिकेटच्या मैदानात परतण्याचे आणि 2020 मध्ये बांग्लादेशसाठी पुन्हा एकदा खेळण्याचे आहे असेही त्याने स्पस्ट केले. (शाकिब अल हसन याचे कथित भारतीय बुकीसह WhatsApp चॅट उघडकीस, IPL 2018 मध्ये फिक्सिंगची दिली होती ऑफर)

शकीबवर दोन वर्षांच्या बंदीविरोधात त्याच्या शेकडो चाहत्यांनी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या बाहेर निदर्शने केली. शाकिबच्या मूळ गावी मगूरमध्ये सुमारे 700 लोक रस्त्यावर निदर्शने करताना दिसल्याची माहिती तेथील पोलिसांनी दिली. यानंतर शाकिबने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना शांतता राखण्याचे आव्हानही केले. शाकिबने लिहिले की, 'माझ्या सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना, मी तुमच्या बिनशर्त पाठिंबा आणि आपुलकीने मी भारावून गेलो आहे. मागील काही दिवसात मला तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अर्थ काय हे नेहमीपेक्षा अधिक जाणवले आहे. माझ्या सर्व समर्थकांना मी शांत आणि संयमाची राखण्याची विनंती करीत आहे." यानंतर शाकिबने हे देखील स्पष्ट केले की आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ICC Anti-Corruption Unit) संपूर्ण तपास गोपनीय ठेवला होता आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) आणि त्याला बंदीच्या घोषणेच्या काही दिवस अगोदरच याबद्दल माहिती मिळाली.

दरम्यान, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा शाकिबकडून केलेले केंद्रीय करार वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर राहिल्याने संपणार आहे. बीसीबीकडून शाकिबला वर्षाकाठी 48 लाख रुपयांचा करारनामा मिळतो, तर सामना शुल्क आणि इतर बक्षिसे त्यात समाविष्ट नाहीत. इतकेच नाही तर आयपीएलसारख्या सर्व लीगचा शाकिब झळकलेले आहे, पण आता बॅनमुळे तो या लीगमध्येही खेळताना दिसणार नाहीत.