Azadi ka Amrit Mahotsav: सरकारचे BCCI ला पत्र- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात खेळवला जावा परदेशी खेळाडूंसोबत खास सामना
बीसीसीआय (Photo Credits: IANS)

ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. याच दिवशी 1947 मध्ये भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले होते. यानिमित्ताने भारत सरकार विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. देशभरात उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. अशात भारत सरकारला त्यात क्रिकेटचाही समावेश करायचा आहे. अहवालानुसार, भारत सरकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावामध्ये 22 ऑगस्ट रोजी भारत आणि इतर देशांमध्ये सामना आयोजित करण्याबाबत भाष्य केले आहे.

हा प्रस्ताव पाठवणाऱ्या सांस्कृतिक मंत्रालयाची बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये प्रयत्न असेल की, ‘आझादी का अमृत महोत्सव’ मोहिमेचा भाग म्हणून भारतातील अव्वल खेळाडू तसेच परदेशातील लोकप्रिय क्रिकेटपटू यामध्ये सामने खेळवले जावेत.’ बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना खेळण्यासाठी बोलावताना अनेक बाबी विचारात घेणे आवश्यक असल्याने या प्रस्तावावर अद्याप चर्चा सुरू आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, त्यांना भारत इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात 22 ऑगस्ट रोजी क्रिकेट सामना आयोजित करण्याचा प्रस्ताव सरकारकडून मिळाला आहे. उर्वरित जागतिक संघासाठी आम्हाला किमान 13-14 आंतरराष्ट्रीय खेळाडूंची आवश्यकता असेल. त्यांची उपलब्धता ही एक गोष्ट आहे ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (हेही वाचा: Shoaib Akhtar ची हज यात्रेतही कमाल, 100mph वेगाने सैतानाला मारला खडा, पहा व्हिडिओ)

त्यावेळी इंग्लंडचे खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत आहेत. वेस्ट इंडिजमधील कॅरेबियन प्रीमियर लीगही त्यावेळी खेळवली जाणार आहे. भारताच्या प्रमुख खेळाडूंच्या उपलब्धतेत फारशी अडचण येणार नाही. 20 ऑगस्ट रोजी झिम्बाब्वे दौरा संपवून संघ परतेल. त्यानंतर 27 ऑगस्टपासून श्रीलंकेत आशिया कप होणार आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी भारतीय खेळाडू सहज उपलब्ध होतील. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्यांच्या सहभागासाठी पैसे द्यावे लागतील का, याचीही बीसीसीआय चौकशी करत आहे.