Ashes 2019: पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंडचा विजय, ऑस्ट्रेलियाचा 135 धावांनी पराभव; मालिका 2-2 ने ड्रॉ
अ‍ॅशेस (Photo Credits: Getty Images)

लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंडच्या (England) भूमीवर 18 वर्षानंतर अ‍ॅशेस (Ashes) मालिका जिंकण्याचे ऑस्ट्रेलियाचे (Australia) स्वप्न शनिवारी संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाने मँचेस्टर कसोटीत इंग्लंडला हरवून मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवून घेतली होती. पण, चौथ्या डावात विजयाच्या 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 263 धावांवर गडगडला आणि ऑस्ट्रेलिया 135 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यासह मालिका 2-2 अशी संपुष्टात आली. अंतिम डावात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याची बॅट काही कमाल करू शकली नाही आणि तो केवळ 23 धावा करून माघारी परतला. मॅथ्यू वेड (Matthew Wade) यालादेखील 117 धावा करुन आपल्या संघाला पराभवापासून वाचविता आले नाही. इतर कोणताही कांगारू फलंदाज वेडेला साथ देऊ शकला नाही. त्याने आपल्या खेळीत 17 चौकार आणि एक षटकार ठोकले. (Ashes 2019: डेविड वॉर्नर याला बाद करत स्टुअर्ट ब्रॉड याने केली वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी, जाणून घ्या)

ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवशी 8 विकेट गमावून 313 धावांच्या पुढे खेळत असलेला इंग्लंड 329 धावांवर बाद झाला. यासह ऑस्ट्रेलियाला 18 वर्षानंतर इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिका जिंकण्यासाठी 399 धावांचे लक्ष्य मिळाले. पहिल्या डावात इंग्लंडला 69 धावांची आघाडी मिळाली होती. विजयासाठी 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात पुन्हा चांगली झाली नाही. 18 च्या स्कोअरवर मार्कस हॅरिस (Marcus Harris) स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या चेंडूवर 9 धावांवर बोल्ड झाला. यानंतर मालिकेच्या शेवटच्या डावातही डेव्हिड वॉर्नर याच्या फलंदाजीच्या अपयशाची कहाणी थांबली नाही. 29 धावांवर 11 धावा केल्या आणि पुन्हा एकदा ब्रॉडचा बळी ठरला. सध्याच्या अ‍ॅशेस मालिकेत ब्रॉडने सातव्यांदा वॉर्नरला आपला बळी बनविला.

29 च्या स्कोअरवर २ गडी गमावल्यानंतर कांगारू संघाची जबाबदारी पुन्हा एकदा मार्लनस लबुशने आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या खांद्यावर पडली. परंतु यावेळी लॅबुशेनेला अपेक्षांची पूर्तता करता आली नाही आणि जॅक लीच याच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्याने 14 धावांची खेळी केली. लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाने 3 गडी राखून 68 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ 18 आणि मॅथ्यू वेड 10 धावांवर नाबाद राहिले. लंचनंतर इंग्लंडने विकेट घेणे सुरु ठेवले. स्मिथ यंदा 23 धावा करू शकला. चहापानानंतर ऑस्ट्रेलियन संघाने 200 धावांचा टप्पा ओलांडला. कर्णधार टिम पेन आणि वेडेने सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पेन लीचच्या चेंडूवर २१ धावा करत एलबीडब्ल्यू बाद होत माघारी परतला. मात्र, वेडने एका टोकाला धरुन ठेवले आणि 147 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. नंतर, 117 धावांवर जो रूट याच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशादेखी मावळल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळण्यास वेळ लागला नाही. इंग्लंडकडून सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ब्रॉड आणि लीच राहिले. त्यांनी प्रत्येकी 4-4 विकेट घेतले. कर्णधार रूटने 2 गडी बाद केले.